Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परवडणार्‍या घरांसाठी सरकार देणार विकासकांना पैसे

परवडणार्‍या घरांसाठी सरकार देणार विकासकांना पैसे

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:42AMमुंबई : चंदन शिरवाळे

केंद्र सरकारच्या परवडणार्‍या घरांच्या योजनेसाठी म्हाडाकडे जमीन शिल्लक नसल्यामुळे खासगी जमीनमालक किंवा विकासकांना त्यांच्या जमिनीवर घरे उभारणीसाठी म्हाडामार्फत पैसे देण्याची  योजना राज्य सरकार आखत आहे. नगरविकास विभागाने या योजनेच्या अंतिम अभिप्रायासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचे समजते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. मुंबई शहर वगळता प्राधिकरणाच्या उर्वरित क्षेत्रामधील शेकडो एकर जमीन खासगी विकासकांनी खरेदी केली आहे. सिडकोकडील लँडबँकेलाही आता घरघर लागली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन विकासक बाजारभावापेक्षाही जादा दराने घरे विक्री करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सर्वसामान्यांची घरखरेदी आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे परवडणारी घरे कशी उभारायची, असा प्रश्‍न सरकारपुढे निर्माण झाला आहे. 

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गंत म्हाडा घरे उभारण्याचा प्रयत्न करत आहे. पण जमीन टंचाईमुळे घरांचे टार्गेट पूर्ण होणे अवघड झाले आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या बिझनेस समेटमधून अनेक बांधकाम व्यावसायिकांसोबत सरकारने जवळपास 6 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. परंतु यातील एकाही प्रकल्पाची वीट रचली गेली नाही. 

म्हाडाकडे सध्या स्वतःची मोठ्या प्रमाणात जमीन नाही. याउलट परिस्थिती खासगी विकासकांची आहे. या विकासकांना परवडणार्‍या दरातील घरे उभारण्यासाठी म्हाडामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. म्हाडाकडून इमारतींचा आराखडा, ले-आऊट तयार केला जाईल. या घरांच्या विक्रीतून 35 टक्के नफा खासगी विकासकाला, तर म्हाडाला 65 टक्के नफा असेल, अशी माहिती नगरविकास विभागातील अधिकार्‍याने दिली. परवडणार्‍या घरांच्या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी घरे उभारल्यास मिळणार्‍या नफ्यातून त्यांना 40 टक्क्के हिस्सा दिला जाईल, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.