Sat, Sep 22, 2018 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहतूकदारांचा संप अखेर मागे

वाहतूकदारांचा संप अखेर मागे

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी

मागील आठ दिवसांपासून मालवाहतूकदारांनी केलेला देशव्यापी संप अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आला. डिझेल व पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात ही मागणी वगळता अन्य मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

इंधनांचे वाढते दर, टोलधोरण, थर्ड पार्टी इन्शुरन्स हप्त्यांमध्ये झालेली वाढ यांसह अनेक मागण्यांसाठी देशभरातील मालवाहतूकदारांची प्रमुख संघटना ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) हा बेमुदत संप पुकारला होता. गेले 8 दिवस सुरू असलेल्या या संपामुळे हजारो कोटींचा फटका बसला. मालवाहतूक ठप्प झाल्याने अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य वस्तूंची आवकही मोठ्या प्रमाणात घटली.

दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चार तास चाललेल्या चर्चेत माल वाहतूकदारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. टोलसंदर्भात पुढील सहा महिन्यांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, तसेच शनिवार, 28 जुलै रोजी इन्शुरन्ससंदर्भात सरकार व मालवाहतूकदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रायव्हर आणि वाहक यांच्यासाठी सरकारकडून खास योजना राबविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. सर्व ड्रायव्हर आणि वाहकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा दिली जाणार असल्याचे आश्‍वासन गोयल यांनी दिले.