Fri, Aug 23, 2019 14:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांनी तोडले चिमुरडीचे लचके

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांनी तोडले चिमुरडीचे लचके

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:07AMडोंबिवली : वार्ताहर

उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या कल्याण-शिळ मार्गावरील लोढा हेवन परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका चिमुरडीवर हल्ला चढवत तिला गंभिररित्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. माही सिंग (8) असे या चिमुरडीचे नाव आहे. गुरुवारीही याच परिसरात महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सुदैवाने तिने यातून सुटका करून घेतली. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा बंदोबस्त करण्यात स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास माही ही रस्त्याने जात होती. याचवेळी अचानक 4-5 भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि अक्षरश: त्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले. हा प्रकार पाहून स्थानिक रहिवासी धावून गेले. त्यांनी या मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिथे तिच्यावर उपचार केले. 

याच परिसरात गुरुवारी देखील श्वेता मेहरा नामक महिलेवर 7-8 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वत:चा जीव वाचवला. मात्र झटापटीदरम्यान या महिलेचा महागडा मोबाईल फुटला. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतापले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. रोज अशा घटना घडत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन का करत नाही ? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन करू असा इशारा लोढा हेवन परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.