Thu, May 28, 2020 08:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फॉर्म्युला ठरलाच नव्हता, सेनेचा आरोप खोटारडेपणाचा : मुनगंटीवार

फॉर्म्युला ठरलाच नव्हता, सेनेचा आरोप खोटारडेपणाचा : मुनगंटीवार

Last Updated: Nov 09 2019 1:26AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 
विधानसभेसाठी सत्ता वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. त्यामुळे शिवसेनेने भाजपवर केलेला आरोप  खोटारडेपणाचा आणि  चुकीचा आहे. राज्याला स्थिर सरकारची गरज असताना शिवसेनेकडून जनतेला वेठीला धरण्याचे काम सुरु आहे, असा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केला. 

मुनगंटीवार म्हणाले की, ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी  पत्रकार परिषद घेऊन आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, अशी भाषा करुन  शिवसेनेने जनतेला वेठीला धरले आहे.  महायुतीच्या जनादेशाचा अनादर करुन भाजपला खोटे ठरवण्याचे काम कोणी करु नये. भाजपचे सत्तेवर प्रेम नाही तर ते जनतेवर आहे. आम्हाला जनतेचे स्वप्न पूर्ण करायची आहेत. मोदी हे माझे मोठे भाऊ आहेत, असे उध्दव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेत राहून मोदी आणि अमित शाह यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही मित्र पक्षाने टीका केलेली नाही. मात्र, सेनेने सत्तेत राहून टीका केली, असे त्यांनी सांगितले.