Sun, May 26, 2019 21:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात खाडीच्या पाण्याचा प्रवाह बदलतोय 

ठाण्यात खाडीच्या पाण्याचा प्रवाह बदलतोय 

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:24AMठाणे : प्रतिनिधी 

एकीकडे खाडीकिनारे विकसित करून पर्यटनास चालना देण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाण्यापासून दिव्यापर्यंतच्या खाडी किनारी अनधिकृत झोपड्या, चाळी, इमारती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे खाडीचे पात्र अरूंद होत असून पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलू लागला आहे. त्यामुळे पावसाळ्यात खाडीतील पाणी पुन्हा नाल्याद्वारे नागरी वस्तीत शिरून साचून राहण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे.

ऐतिहासिक ठाण्याला एकाबाजूला हिरवागार डोंगरपट्टा लाभला असून दुसर्‍या बाजूने विस्तीर्ण खाडीकिनारा  आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्याचा खाडीकिनारा विकसित करण्याचा प्रयत्न महापालिका आणि राज्य शासनाकडून होत आहे. त्याअनुषंगाने वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट योजना राबविण्यात येत आहे. एवढेच नाही तर मुंब्रा खाडीकिनारी देशातील सर्वात मोठी आणि सुंदर अशी चौपाटी उभारली जात आहे. अशा पार्श्‍वभूमीवर कळवा, कोपरी, गायमुख, नागलाबंदर, वाघबीळ, कोलशेत, मुंब्रा, दिवा, विटावा या खाडीकिनार्‍यांना विशेष महत्व आलेले आहे. 

खाडीकिनार्‍यावरील अतिक्रमण आणि अनधिकृत झोपड्याधारकांना सरकारकडून मोफत सदनिका मिळत असल्याने आजही राजरोसपणे कळवा, मुंब्रा, दिवा किनारी अनधिकृत चाळी, झोपड्या उभ्या राहत आहेत. परिणामी खाडीचे पात्र अरुंद होऊ लागले आहे. कळवा पुलाजवळील झोपड्या, जानकी पान 1 वरून : नगर ते महात्मा फुलेनगरपर्यंत वाढणार्‍या झोपड्यांनी खाडी किनारा व्यापलेला आहे. मुंब्रा स्टेशनजवळील खाडी किनार्‍यावरील बांधलेल्या चाळी आणि  दिवा पूर्वे-पश्‍चिमकडील अनधिकृत बांधकामांमुळे खाडी किनार्‍यांची  रुंदी कमी कमी होऊ लागली आहे. 

त्याचा फटका पावसाळ्यामध्ये खाडीतील पाणी नाल्याद्वारे पुन्हा शहरामधील काही सखल भागात येण्याची भीती निर्माण झाली आहे. भरतीच्या काळामध्ये 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तर ठामपा हद्दीतील सखल भागामध्ये पाणी साचून राहण्याचा प्रकार हा नागरिकांना त्रासाचा ठरत आहे. खाडीच्या पाण्याचा प्रवाह बदलण्यापासून रोखण्यासाठी खाडी किनारी असलेले अतिक्रमण तातडीने हटविण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा पावसाळ्यात खाडीचे पाणी नागरी वस्तीत शिरून मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.