Sun, Apr 21, 2019 06:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये खड्डेबंबाळ रस्त्याचा पाचवा बळी

कल्याणमध्ये खड्डेबंबाळ रस्त्याचा पाचवा बळी

Published On: Jul 14 2018 1:05AM | Last Updated: Jul 14 2018 12:59AMकल्याण ः वार्ताहर

कल्याणमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्येे बळी जाण्याची मालिकाच सुरू असून  तीन दिवसांपूर्वी कल्याण-मलंग रस्त्यावर खड्ड्यात पडून पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याण पश्‍चिमेकडील गांधारी पुलाजवळील खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कल्पेश जाधव (28, रा. नांदकर-भिवंडी) जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.   

कल्याणमधील खड्ड्यांनी घेतलेला हा पाचवा बळी आहे.  8 महिन्यांपूर्वीच लग्न झालेला कल्पेश  मध्यरात्री कामानिमित्त  दुचाकीने गांधारी पुलावरून कल्याणला जात होता. पूल ओलांडताच रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याचा त्याला अंदाज आला नाही.   तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच वेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरखाली तो चिरडला गेला. कल्पेशचा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय होता. तो खासगी कंपनीत नोकरीही करीत होता. त्याच्यापश्‍चात पत्नी, आई-वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे. खडकपाडा पोलीस फरार कंटेनरचालकाचा  शोध घेत आहेत.       

कल्याण-डोंबिवलीला गुढ धक्के 

डोंबिवलीपासून कल्याण, मोहने ते टिटवाळ्यादरम्यान धरणीकंप झाल्यासारखे सौम्य हादरे बसल्याचे वृत्त आहे. अचानक बसलेल्या हादर्‍यांमुळे भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र धरणीकंप झाल्याच्या वृत्ताला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. खड्ड्यांमुळे बळी पडणार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे आधीच भीतीच्या सावटाखाली असणारे कल्याण-डोंबिवलीकर रात्री साडेनऊच्या सुमारास बसलेल्या गूढ धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरलेले पहायला मिळाले. 

साधारणपणे 9 वाजून 33 वाजता हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी दिली. मात्र हे हादरे बसले ते भूकंपाचे होते की आणखी कशाचे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अचानक बसलेल्या या गूढ हादर्‍यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादर्‍यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

याबाबत ठाणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता या हादर्‍यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे हादरे म्हणजे भूकंपाचा सौम्य धक्का होता की नुसतीच कंपने होती, ते अधिकृत माहिती आल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान जवळची सर्व धरणे भरत चालली आहेत. धरणावर पडणार्‍या दाबाने भूकंपाचे सौम्य झटके जाणवले असावेत, असे पॉजचे संस्थापक निलेश भणगे माहिती देताना सांगितले.