Mon, Mar 25, 2019 05:31
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परेवर लवकरच सहा डबे एसीचे, सहा डबे साधे

परेवर लवकरच सहा डबे एसीचे, सहा डबे साधे

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

देशातील पहिली वातानुकूलित लोकल मुंबई रेल्वेने सुरु केली. अधिक प्रवासी लाभावेत यासाठी रेल्वेकडून विविध कल्पना राबविण्यात येतात. लवकरच पश्‍चिम रेल्वे मार्गावर सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे साधे अशा स्वरुपाची लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता 24 एसी लोकल मुंबईला मिळणार आहेत. त्यातच काही लोकल मध्य रेल्वेलाही मिळणार असल्याने मुंबईकरांचा लोकलप्रवास खर्‍या अर्थाने गारेगार होणार आहे.

सध्या वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात अवघ्या बारा फेर्‍या होत आहेत. अनेकांना इच्छा असूनही आपल्या वेळेत एसी लोकल उपलब्ध होत नसल्याने प्रवास करणे शक्य होत नाही. अधिकाधिक प्रवाशांना वातानुकूलित लोकलने प्रवास करता यावा यासाठी प्रत्येकी 12 डब्यांच्या या लोकलची सहा-सहा डब्यांत विभागणी करण्यात येणार आहे. सहा डबे एसीचे तर सहा डबे साधे बम्बार्डिअरचे किंवा सिमेन्सचे अशा मिक्स 24 लोकल तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी बम्बार्डिअर किंवा सिमेन्स कंपनीला टेंडर देण्यात येणार आहे.  नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात या लोकल एकामागोमाग येण्यास सुरुवात होणार असून मध्य रेल्वेलाही काही लोकल मिळणार असल्या तरी त्यांची नेमकी संख्या अद्याप ठरली नसल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले.