Tue, Apr 23, 2019 22:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शारदाश्रम ‘महाराष्ट्रा’तच!

शारदाश्रम ‘महाराष्ट्रा’तच!

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

अखेर मराठीप्रेमी पालकांनी छेडलेले आंदोलन यशस्वी ठरले आणि आयसीएसई बोर्ड स्वीकारण्यास निघालेली दादरची प्रसिद्ध शारदाश्रम शाळा महाराष्ट्रातच कायम राहिली. इंग्रजी माध्यमाचा राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून, तो आयसीएसई बोर्डात रूपांतरित करण्याचा घाट शाळा व्यवस्थापनाने आता गुंडाळला आहे. 

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरची शाळा म्हणूनही शारदाश्रमचा लौकिक आहे. या प्रख्यात मराठी शाळेने महाराष्ट्राचा अभ्यासक्रम कचराकुंडीत टाकत केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे शारदाश्रम हे नावदेखील इतिहासजमा करत एस.व्ही.एम. इंटरनॅशनल स्कूल असे नाव स्वीकारण्याचीही प्रक्रिया सुरू केली होती. शिक्षण विभागाने हे नामांतरही आता मोडीत काढले आहे.

शारदाश्रम शाळेने बंद केलेले एसएससी बोर्डाचे प्रवेश पुन्हा सुरू केले असून 10 मेपर्यंत एसएससी बोर्डासाठीच्या प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार असल्याची नोटीस शारदाश्रमच्या सूचना फलकावर लागली आहे.
चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी व्यवस्थापन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केला होता. पालकांनी शिक्षण संघटनांकडेही तक्रारीदेखील केल्या. शाळेचे व्यवस्थापन शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीसाठी आयसीएसई बोर्डात प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांकडे ना हरकत प्रमाणपत्रे मागितली. मात्र, अनेक पालकांनी आयसीएसई बोर्डात पाल्याला प्रवेश घेऊ देण्यास विरोध दर्शविला होता. परिणामी शारदाश्रम विद्यामंदिर व्यवस्थापनाला पालकांसमोर नमते घ्यावे लागले. याची परिणीती म्हणूनच शाळा व्यवस्थापनाने मंगळवारी इयत्ता 5 मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरु केले आहेत.

Tags : Mumbai, mumbai news, Shardashram  school,  Maharashtra,