Tue, Nov 19, 2019 12:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीची ‘कट ऑफ’ ९२-९४ टक्क्यांवर !

अकरावीची ‘कट ऑफ’ ९२-९४ टक्क्यांवर !

Published On: Jul 13 2019 1:40AM | Last Updated: Jul 13 2019 1:40AM
मुंबई : प्रतिनिधी

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत गुणवंत विद्यार्थ्यांचे वर्चस्व दिसून आले असून नामांकित महाविद्यालयांतील पहिल्या कट ऑफने 86 ते 94 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या कमी निकालाचा परिणाम फारसा यादीवर झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत काही महाविद्यालयांची अकरावीची कट ऑफ एक ते दोन टक्क्यांनी कमी झाली आहे. तर काही महाविद्यालयांची एक ते दीड टक्क्यांनी वाढल्याचेही चित्र आहे.

पहिल्या यादीत अर्ज केलेल्या तब्बल 72 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मात्र पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसर्‍या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण 1 लाख 85 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी एकूण 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आले आहेत. अर्ज केलेल्या 50 हजार 851 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय 48 हजार 872 विद्यार्थ्यांना मिळाले आहे. यामुळे हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील. दुसर्‍या पसंतीक्रमापासून प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी पुढच्या यादीची वाट पाहण्याची संधी आहे. यावर्षी प्रथमच असलेल्या एसईबीसी आणि ईडब्लूएस विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आले आहेत. एसईबीसी 3287 तर ईडब्लूएस प्रवर्गातून 597 विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश देण्यात आला आहे.
राज्य मंडळाचा निकाल यंदा कमी झाल्यामुळे तसेच केंद्रीय विद्यार्थ्यांना 90प्लस गुण असल्याने पहिल्या यादीत टक्केवारी वाढेल अशी शक्यता होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कटऑफमध्ये फारसा परिणाम झालेला नाही. काही मोजक्याच महाविद्यालयांतील कटऑफ 90 ते 94 टक्यांवर पोहचली आहे. अनेक महाविद्यालयातील कटऑफ 80 ते 85 यावरच स्थिरावल्या असल्याचे दिसून येते. 88 ते 85 टक्के गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अनेकांना मिळालेले नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. कला आणि आणि वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमांची कट ऑफ वाढली असल्याने नामवंत  महाविद्यालयातील पहिल्या यादीत 80 टक्के जागा या या यादीत भरल्या जाण्याची शक्यता आहे.  रुईया महाविद्यालयाची गेल्या वर्षी विज्ञान शाखेचे कटऑफ 93.20 इतके होते. यंदा कमी झाले असून 91 टक्यावर पहिली यादी स्थिर झाली आहे.

एसएससीचे वर्चस्व

 पहिल्या यादीत एसएससी बोर्डाच्या तब्बल 1 लाख 21 हजार 553 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर त्या पाठोपाठ  आयसीएसईच्या 6 हजार 318  विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. तर  सीबीएसईच्या 4679 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाले 80 हजार 402 विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत 38 हजार 714 विद्यार्थ्यांना तर कला शाखेसाठी 14हजार 131 विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आले आहेत.

पहिली पसंती : आता पुन्हा संधी नाही

अकरावी प्रवेशात पहिल्या प्रवेश यादीत तब्बल 48 हजार 872 विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी दिलेले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावून प्रवेश घेणे आवश्यकच असणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता नंतरच्या यादीची वाट न पहाता प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. कला शाखेतील 7337, वाणिज्य शाखेतील 23349 विज्ञान शाखेतील 17052 व्होकेशनलचे 1134 विद्यार्थी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहेत.