अहिल्यादेवींचे वंशजही भाजपमध्ये

Published On: Sep 23 2019 2:18AM | Last Updated: Sep 23 2019 2:17AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या समाज घटकांसाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांमुळे सामान्य माणसांचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढू लागला आहे. यामुळेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र प्रवेश करणार्‍यांचे कर्तृत्व पाहून संधी दिली जाईल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

अहल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर, माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार संदेश कोंडविलकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी राज्यमंत्री बापुसाहेब थिटे यांचे पुत्र राजेंद्र थिटे, कल्याण महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अनिल पंडीत, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे दिनेश तावडे, मुंबई तेली साहू समाजाचे अध्यक्ष अशोक साहू, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, भाट समाजाचे अध्यक्ष भूषण गांगुर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाच्या यशामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच ईव्हिएमच्या विश्वासार्हतेबद्द्ल विरोधक शंका घेऊ लागले आहेत. मात्र, देशाच्या सुरक्षिततेसाठी योजलेले कडक उपाय, सामान्य माणसाच्या हितासाठी घेतलेले अनेक निर्णय यामुळे जनतेला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपा विषयी विश्वास वाटू लागलेला आहे. यावेळी भाजपा प्रदेश सचिव आ. नरेंद्र पवार, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.