Sat, May 25, 2019 23:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्माकोलबंदीतून बाप्पा तूर्त सुटले

थर्माकोलबंदीतून बाप्पा तूर्त सुटले

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

थर्माकोलच्या सर्व वस्तूंवर प्लास्टिकप्रमाणेच बंदी घालण्यात आली असली तरी या बंदीतून गणरायाची सजावट यंदापुरती वगळण्यात आली आहे. 

गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होतो. मखरनिर्मात्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची समस्या सरकारपुढे मांडली आहे. गणेशोत्सवाची तयारी आठ ते दहा महिने आधीपासूनच करण्यात येते. त्यामुळे थर्माकोलची खरेदी त्यांनी बंदी आदेश काढण्यापूर्वीच केली आहे. फक्त या वर्षी थर्माकोलच्या मखरांना परवानगी देण्यात यावी. बाजारात विक्री केलेले प्रत्येक मखर ग्राहकाकडून परत घेऊ.

विकलेल्या प्रत्येक मखराची नोंद करून त्याची माहिती पालिकेला देण्यात येईल.परत घेतलेले मखर नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत प्रतिज्ञापत्रही द्यायची तयारी मकरनिर्मात्यांनी दाखविली आहे.  हा विषय उच्चस्तरीय समितीमध्ये विचारासाठी सादर करून थर्माकोल मकरनिर्मात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

बंदीचा थर्माकोल मखरवाल्यांना फटका

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात मोठ्याप्रमाणात थर्माकोलच्या मकरची विक्री होते. 
दादर येथे गणेशोत्सवात 2017 मध्ये मखरविक्रीचा उच्चांक झाला होता. तब्बल 1 लाख 5  हजार लहान-मोठ्या मकरांची विक्री झाली होती. 
सुमारे 15 ते 20 कोटी रुपयांची ही उलाढाल होती. 
भविष्यात थर्माकोलबंदीचा फटका ओघानेच या धंद्यावर अवलंबून असणार्‍या हजारो कुटुंबांना  बसणार आहे.