Sun, Sep 23, 2018 10:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेताच्या बांधावर होणार वृक्षलागवड : मुनगंटीवार

शेताच्या बांधावर होणार वृक्षलागवड : मुनगंटीवार

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

सामाजिक वनीकरण मोहीमेत आता म. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेत बांधावर,जमिनीवर वृक्ष लागवड करता येणार आहे. यामुळे राज्याचे वृक्षाच्छादन वाढण्यास मदत होईल. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार संधीही निर्माण होणार, असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

शेतकर्‍यांच्या बांधावर आणि शेतात करावयाच्या वृक्ष लागवडीत साग, चंदन, खाया, बांबू, निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जून, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू (रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी), फणस, ताड, शिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडिपत्ता, महारूख, मँजियम, मेलिया डुबिया यासारख्या प्रजातींची वृक्ष लागवड करता येणार आहे. वृक्ष लागवडीचा कालावधी 1 जून ते 30 नोव्हेंबर असा राहणार असून यासंबंधीचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहयो अंतर्गत होणार्‍या वृक्ष लागवडीची नोंद स्वतंत्र ठेवली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती,  विमुक्त जाती, शारीरिकदृष्टया विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, परंपरागत वन निवासी भूधारक शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत वृक्ष लागवड  करता येईल. वृक्ष लागवडीच्या या योजनेत दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी बागायत वृक्ष पिकांच्या बाबतीत जे लाभार्थी कमीत कमी 90 टक्के आणि  कोरडवाहू पिकांच्या बाबतीत 75 टक्के झाड जिवंत ठेवतील त्यांनाच दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी अनुदान देण्यात येणार आहे.

Tags : Mumbai, cultivation,  trees, farm, ground, can, planted