Wed, Apr 24, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करा

पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील झोपड्यांना वीजजोडणी देताना, महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र बंधकारक करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा ठराव पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत अनधिकृत उभ्या राहणार्‍या झोपड्यांची संख्या रोखणे शक्य होणार आहे.

एखाद्या अनधिकृत झोपडीला पालिकेने कारवाईची नोटीस बजावली की, तो झोपडीधारक वीज बिलाची प्रत कोर्टात सादर करून कारवाईला स्थगिती मिळवतो. अशा हजारो झोपड्या मुंबईत असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका रिध्दी खुरसंगे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. 

मुंबईत झपाट्याने वाढणारी अनधिकृत झोपड्यांची संख्या थांबवणे आवश्यक झाले आहे. यासाठी वीज जोडणी देताना, पालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट टाकण्यात यावी, अशी मागणीही खुरसंगे यांनी केली आहे. याबाबतची ठरावाची सूचना महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. 

या ठरावाला शिवसेनेकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे सोमवार 27 नोव्हेंबरला पालिका सभागृहात हा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान ना हरकत प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे मुंबईत झोपडी उभारली तरी, त्याला वीज व पाणीपुरवठा मिळणार नाही. परिणामी झोपडी उभारण्याची संख्या घटेल, असा विश्‍वास पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने व्यक्त केला.