Mon, Aug 26, 2019 08:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोस्टल रोडची टाटा गार्डनवर टाच? झाडांवर कुर्‍हाड अटळ

कोस्टल रोडची टाटा गार्डनवर टाच? झाडांवर कुर्‍हाड अटळ

Published On: Apr 25 2019 1:44AM | Last Updated: Apr 25 2019 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण मुंबईच्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडच्या मार्गातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. या रोडच्या कामाविरोधात मच्छिमार बांधवांनी आधीच न्यायालयात धाव घेतली आहे. आता या रोडच्या मार्गात असणार्‍या टाटा गार्डनमधील झाडांवर कुर्‍हाड चालवावी लागणार आहे. 

भुलाभाई देसाई मार्गावर असणार्‍या या गार्डनमधून कोस्टल रोडचा काही भाग जाणार आहे. या भागातून मलबार हिल, पेडर रोड आणि महालक्ष्मीकडे जाणारी वाहने वळवण्यात येणार आहेत. दरम्यान 1.06 एकरवर असलेल्या या गार्डनचा किती भाग कोस्टल रोडमध्ये जाणार आहे याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये निश्‍चितता नाही. या गार्डनमध्ये असणारी झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे अद्याप परवानगी मागण्यात आलेली नाही. तथापि कमीत कमी झाडे कापली जावीत  यादृष्टीने पालिका विचार करीत आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले. या रस्त्याच्या कामामुळे गार्डनच्या बाजूला असलेला पदपथ पूर्णपणे जाणार असल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. रहिवाशांच्या सोयीसाठी पालिकेने नवी जागा सुचवली आहे. मात्र या जागेपर्यंत जाण्यासाठी प्रचंड मोठी रहदारी पार करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या जागेत किती जण फिरायला जातील हा प्रश्‍नच आहे, असे ब्रीच कॅन्डी वेल्फेअर ग्रुपचे डॉ. निलेश बक्षी यांनी सांगितले. झाडे उद्ध्वस्त करण्याला विरोध म्हणून डॉ. बक्षी यांनी ‘राखी बांधो, वृक्ष बचाओ’ ही मोहीम राबवली आहे. 

जुनी झाडे तोडण्याआधी नव्या झाडांची लागवड करावी, असा आग्रह तेथील रहिवासी निरंजन शेट्टी यांनी धरला आहे. त्यांनी हा रस्ता गार्डनमधून नेण्याऐवजी दुसर्‍या एका जवळच्या मार्गाद्वारे न्यावा, असे पालिकेला सुचवले होते. मात्र हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.