Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मुंबईकर पेंग्‍विन'चं आयुष्य आठवडाभराचंच!

'मुंबईकर पेंग्‍विन'चं आयुष्य आठवडाभराचंच!

Published On: Aug 24 2018 6:37PM | Last Updated: Aug 24 2018 7:35PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात १५ ऑगस्‍टला जन्‍मलेल्या पेंग्‍विनच्या पिलाचे आयुष्य केवळ आठवडाभराचेच ठरले आहे. भारतात जन्‍मलेल्या या पहिल्याच पेंग्‍विन पिलाने २२ ऑगस्‍ट रोजीच अखेरचा श्वास घेतला. जन्‍मजात असणार्‍या विसंगतीमुळे पिलू दगावल्याचे उद्यानाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

आई फ्‍लिपर आणि बाबा मोल्‍ट यांनी १५ ऑगस्‍ट रोजी संध्याकाळी ८ वाजून २ मिनिटांनी पिलाला जन्‍म दिला. भारतीय वातावरणात जन्‍मलेलं हे पहिलंच पिलू होतं. त्यामुळे डॉक्‍टर त्याच्या देखभालीची विशेष काळजी घेत होते. परंतु, २२ ऑगस्‍ट रोजी सकाळीच पिलाच प्रकृती बिघडली. यातच रात्री त्याचा मृत्यू झाला. 

२३ ऑगस्‍ट रोजी उद्यानाच्या रुग्‍णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात नवजात बालकातील विसंगतीमुळे पिलाचा मृत्यू झाल्याचे आढळले. म्‍हणजेच अंड्यातील पिवळा बलक वापरला न जाणे किंवा यकृतातील बिघाडामुळे झाल्याचा डॉक्‍टरांचा अंदाज आहे.  

पेंग्‍विन हा थंड प्रदेशातील पक्षी. हम्‍बोल्‍ट पेंग्‍विन पेरू या देशामध्ये आढळतात. परंतु, दक्षिण कोरियातील सोलू येथून भारतात दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ ला भायखळा येथील या प्राणिसंग्रहालयात आठ हम्‍बोल्ट पेंग्‍विन आणण्यात आले. यात तीन नर तर पाच मादी पेंग्‍विन होते. आठ पेंग्‍विनपैकी १८ आक्‍टोबर २०१६ रोजी डोरी या मादीचा मृत्यू झाला होता.

यातीलच सर्वात कमी वयाच्या तीन वर्षीय मोल्‍टकडून पाच वर्षीय फ्‍लिपरने ५ जुलैला अंडे दिले होते. आई फ्‍लिपर आणि बाबा मोल्‍ट यांनी १५ ऑगस्‍ट रोजी पिलाला जन्‍म दिला. भारतात जन्‍मलेले पहिलेच पिलू असल्याने त्याची विशेष काळजी घेतली जात होती. भारतात पेंग्‍विनचे पिलू जन्‍माला आले परंतु ते जास्‍त काळ जगू शकले नाही. 

पेंग्‍विन पिलाचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्‍हायरल होताच लोकांतून हळहळ व्यक्‍त होत आहे. तसेच थंड प्रदेशातील हे पक्षी भारतातील प्रतिकूल हवामानात जगू शकतात का? असा प्रश्नही उपस्‍थित होत आहे.