Sun, Aug 25, 2019 12:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बांधकामांवरील बंदी उठवण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार - मुख्यमंत्री

बांधकामांवरील बंदी उठवण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार - मुख्यमंत्री

Published On: Sep 01 2018 4:50PM | Last Updated: Sep 01 2018 4:50PMमुंबई : प्रतिनिधी

राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे धोरण यापूर्वीच आखले असून त्यानुसार नियम तयार करण्यात आले आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील गृहसंकुले व इतर बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

वाढत्या मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याबाबत महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दंड आकारला आहे. तसेच योग्य धोरण असल्याशिवाय बांधकाम करता येणार नसल्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाचे घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे धोरण व नियम तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

घनकचरा व्यवस्थापना संदर्भातील धोरणानुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर होऊ शकली नव्हती. राज्य शासन यासंदर्भातील वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असून बांधकामांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याची विनंतीही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.