Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांची भेट कधी?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांची भेट कधी?

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:34AMठाणे : प्रतिनिधी 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 1 महिन्यात पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करण्याचे जाहीर आश्‍वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथे झालेल्या  91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिले होते. साहित्य संमेलन होऊन 5 महिने झाले तरी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना त्यांच्या आश्‍वासनाचा विसर पडला का, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी  महाराष्ट्र  सरकार आग्रही आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी  साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली होती. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारने पुरावे दिले आहेत.  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते, मात्र 5 महिने लोटूनही याबाबत कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या घोषणांचा विसर पडला का, असा प्रश्‍न डॉ. श्रीपाद  जोशी यांनी उपस्थित केला आहे.

साहित्य संमेलनानंतर साहित्य महामंडळाने 15 मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच  शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांना मागण्यांचे निवेदन सादर केले होते.  बंगाली, कानडी, तेलगू हा विषय त्या-त्या राज्यांत सक्तीचा आहे.  महाराष्ट्रात  12 वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करणारा शिक्षण कायदा करावा, मराठी विकास प्राधिकरण स्थापन करावे, मराठी भाषा विभागात संचालकपद निर्माण करावे आणि मराठी भाषा विभागासाठी किमान 100 कोटींची तरतूद करावी, या मागण्या त्यांना सांगितल्या होत्या. त्यांनीही सरकार यासाठी गंभीरपणे पावले उचलेल असा विश्वास दिला होता. मात्र त्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.