होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-गोवा महामार्ग सहा तास ठप्प

मुंबई-गोवा महामार्ग सहा तास ठप्प

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:48AMरायगड : विशेष प्रतिनिधी

रविवार आणि सोमवारी रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाःकार उडाला असून पनवेलमध्ये तलावात तीन तरुण बुडाले. तर मुंबई - गोवा महामार्गावर कर्नाळा येथे महामार्ग खचल्याने जवळजवळ सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल परिसरात पावसामुळे जलमय स्थिती होती. विमानतळाच्या भरावामुळे 4 गावे जलमय झाली होती. तर सुधागडमध्ये मुख्य रस्त्यावरील मोरी वाहून गेल्याने वाकण-पाली वाहतूक बंद झाली होती. हवामान खात्याने पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाकण ते पाली फाटा हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडी ने हाती घेतले आहे. पावसाळा सुरु झाल्याने वाहतुकीची व सुरक्षितेच्या बाबतीत ठेकेदाराकडून कोणतीही काळजी घेतली गेली नाही. नवीन रस्ता तयार करतांना पावसाच्या पाण्याचा कोणताही विचार न करता मोठे पाईप असलेल्या मोर्‍या टाकल्या गेल्याने पूर्वीच्या जुन्या रस्त्याला असलेल्या लहान मोर्‍या हा पाण्याचा प्रवाह सहन न करू शकल्याने जुने पाईप पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा रस्ता वाहून गेल्याने भगदाड पडले तर पाण्याच्या प्रवाहात हा रस्ता वाहून गेला आहे.

या कामामुळे एमएसआरडीच्या कामाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. पालीचे तहसीलदार बाबुराव निंबाळकर आणि पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आणि सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु एमएसआरडी अधिकारी आणि कंत्राटदार हे घटना घडून चार तास झाले तरी उपस्थित झाले नाही. सोमवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास रस्ता रुंदीकरणाच्या खड्डे युक्त रस्तात पाण्याचा मोठा प्रवाह अडविला गेला. जुन्या रस्त्याला अर्धे खोदल्यामुळे रस्त्याची क्षमता खालावली गेली होती आणि त्यात अनेक मोरयांवर टाकलेली पाईप हे छोटे आहेत. पाणी या पाईपांमध्ये प्रेशर ने वाहत असतांना पाण्याच्या प्रवाहापुढे जुने पाईप पाण्यासह वाहून गेले व वरील रस्ता दोन्ही बाजून खचला व तो हि पाण्याबरोबर वाहून गेला आहे.

या राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अचानक बंद पडल्याने वाहनांची मोठी लाईन लागली आहे. या कामावर नियुक्त केलेले इंजिनिअर व कामगार यांच्या मदतीने रस्त्यातील माती आणि पाईप काढण्याचे काम सुरु केले असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी तहसीलदार बाबुराव निंबाळकर आणि पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची बोलणी सुरु आहे. रस्ता वाहून गेल्याने ती मोरी टाकण्यासाठी बर्‍याच दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि पर्यायी रस्ता केला तरी सुद्धा पाण्याचा प्रवाहात हा रस्ता वाहनांसाठी धोकेदायक होणार आहे त्यामुळे किती दिवस हा महामार्ग बंद राहणार हे सांगता येत नाही असे तेथील एका जाणकार कामगाराने सांगितले. पावसाळा येईपर्यंत नवीन कामाचा सपाटा कंत्राटदाराने लावल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे.