महायुतीने जनादेशाचा आदर करावा : पवार

Last Updated: Nov 09 2019 12:39AM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्रिपदावरून सरकार स्थापनेचे घोडे अडल्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्‍त केली आहे. पावसाचे संकट असताना राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्यामुळे युतीने जनादेशाचा आदर करून सरकार स्थापन करावे, असा सल्लाही त्यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे.

मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्यपालांना लवकरच निर्णय घ्यावा लागेल. सरकार स्थापन न झाल्यास राज्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा त्यांनी दोन्ही पक्षांना दिला.

सध्याचे राजकीय वातावरण राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. अवकाळी पाऊस व काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांची स्थिती चिंताजनक झाली आहे. यावर उपाययोजना व शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना व भाजपने सरकार बनवावे, असे पवार म्हणाले.

काँग्रेस - राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल काय, असा सवाल केला असता आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असते तर आम्ही थांबलो नसतो. तसेच सत्ता स्थापनेसाठी सोबत येण्याविषयी भाजप किंवा शिवसेनेने आमच्याशी संपर्क केला नाही, असेही त्यांनी सांगितले.

रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दुपारी पवार यांची सिल्व्हर ओक  निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, ‘आठवले संसदेत बोलतात तेव्हा त्यांचे म्हणणे सर्व गांभीर्याने घेत असतात. त्यामुळे ते आता त्यांच्या मित्र पक्षांना सरकार स्थापन करण्याचा सल्ला देतील,’ अशी मिश्कील टिपण्णी पवार यांनी केली. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत. बिघडलेले राजकीय वातावरण पूर्वपदावर आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवे, हा सल्ला घेण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.