Sat, Apr 20, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक’ परिषद

राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक’ परिषद

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:08AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने पहिल्या ममॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आहे. एमएमआरडीए ग्राऊण्ड येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका संयुक्त कार्यक्रमात दिली. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, एम.आय.डी.सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यावेळी उपस्थित होते. 

राज्याने औद्यागिक क्षेत्रात गेल्या तीन वर्षात पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. देशाच्या एकुण परकीय गुंतवणूकीपैकी सुमारे पन्नास टक्के परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते. पायाभूत सुविधा, निर्यात आणि वित्त क्षेत्रातही राज्य कायम आघाडीवर आहे. येत्या दहा वर्षात राज्यात ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था तयार होईल असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

उद्योगमंत्री देसाई यांनी नव्या योजनांमुळे राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.  राज्याने जाहिर केलेले महिला उद्योग धोरण हे राष्ट्रीय स्तरावरील पहिलेच जाहीर धोरण असल्याचे सांगितले. 

राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या परिषदेत मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर 30 या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे पहिले बक्षिस 50 लाख रुपये, दुसरे 30 लाख रुपये आणि तिसरे 20 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.