Wed, Mar 27, 2019 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएस वादातून उपायुक्ताची मुंबईत परतण्यासाठी धडपड 

आयपीएस वादातून उपायुक्ताची मुंबईत परतण्यासाठी धडपड 

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 12:54AMमुंबई : अवधूत खराडे

आपीएस अधिकार्‍यांमध्ये असलेले वाद सहसा चार भींतींच्या बाहेर पडत नाहीत. तसेच या वादातून वचपा काढण्याची संधीही हे अधिकारी गमावत नसल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच झालेली बदली रद्द करुन मुंबईत पुन्हा पतण्यासाठी एका उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने मंत्रालयात धडपड सुरु केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या अधिकार्‍याच्या प्रयत्नाला कितपत यश येते आणि हा अधिकारी आणखी किती काळ बचावतो हे येणारा काळच ठरवणार हे निश्‍चित.

मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असताना वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍याविरोधात एका उपायुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकार्‍याने उच्चपदस्थ अधिकार्‍याचे कान भरले. त्यानंतर या उच्चपदस्थ अधिकार्‍याने आपले वजन वापरुन वरीष्ठ अधिकार्‍याचे पंखही छाटले. ही गोष्ट दडून न राहाता त्या वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍याला समजली. मात्र आपल्या विरोधात कान भरणार्‍या या उपायुक्ताचे उच्चपदस्थ अधिकार्‍यासोबत चांगले संबंध असल्याने तो वरीष्ठ अधिकारी काहीच करु शकत नव्हता. त्यामुळे यावर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

गृहमंत्रालयाने मे महिन्यामध्ये अन्य अधिकार्‍यांसोबत मुंबईतील या वरीष्ठ आयपीएस अधिकार्‍याला बढती देत त्याची परिक्षेत्रामध्ये नियुक्ती केली. कर्मधर्म सहयोगाने म्हणा, दोन महिन्यांनी म्हणजेच 28 जुलैला गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेल्या बदल्यामध्ये वरीष्ठ अधिकार्‍याच्या रेंजमध्ये येणार्‍या जिल्ह्याच्या ठिकाणी या उपायुक्त अधिकार्‍याची बदली करण्यात आली आणि त्याची झोपच उडाली. हा उपायुक्त नियुक्तीच्या ठिकाणी कधी हजर होतो याची तो वरीष्ठ अधिकारी वाट बघत आहे आणि हा आपली बदली रद्द करण्यासाठी मंत्रालयाच्या चकरा मारत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. 
गृहमंत्रालय या उपायुक्ताची बदली रद्द करुन त्याला दिलासा देण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून या उपायुक्तासह अन्य काही नाराजांनी आपल्या नवीन नियुक्त्या रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे येत्याकाळात गृहमंत्रालयाकडून काही नियुक्त्यांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे.