Sat, Jun 06, 2020 12:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील विकासकामे रखडणार

मुंबईतील विकासकामे रखडणार

Published On: May 16 2019 2:08AM | Last Updated: May 16 2019 2:08AM
मुंबई : प्रतिनिधी

तज्ज्ञ व्यक्तींची समितीवर नेमणूक  नसल्याने वृक्ष प्राधिकरणाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्याची विनंती करणार्‍या मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाने बुधवारी चांगलाच दणका दिला. जोपर्यंत तज्ज्ञ व्यक्तींची समितीवर नियुक्ती केली जाणार नाही, तोपर्यंत वृक्ष तोडीबाबत पालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट करत सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठाने प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला. 

न्यायालयाच्या या भूमिकेमुळे मुंबईतील विकासकामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान आरेतील वृक्षतोडीला परवानगी असली, तरी याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मेट्रो तसेच पालिकेला देण्यात आले आहेत.

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ज्ञांचा अभाव असल्याने हायकोर्टाने 24 ऑक्टोबर 2018 रोजी वृक्ष प्राधिकरण समितीलाच स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात केला. त्या अर्जावर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पालिकेच्या वतीने  या समितीत चार तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचे सांगताना पावसाळा जवळ येत असून त्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तसेच  परवानगी देण्यास समिती नसल्याने  मुंबईतील इतर विकासकामेही खोळंबली असून वृक्ष प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने जोपर्यंत तज्ज्ञांची नियुक्ती केली जात नाही, तोपर्यंत स्थगिती उठविली जाणार नसल्याचे स्पष्ट करत याचिकेची सुनावणी 20 मेपर्यंत तहकूब ठेवली.