होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुरबाडच्या आगीत ब्रिटिशकालीन इमारत खाक

मुरबाडच्या आगीत ब्रिटिशकालीन इमारत खाक

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:34AM

बुकमार्क करा
मुरबाड : वार्ताहर  

मुरबाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिरासमोरील तेलवणे यांच्या 125 वर्षे जुन्या इमारतीला शुक्रवारी रात्री 10.35 च्या सुमारास आग लागली. त्यातच 2 सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण करून काही तासांतच संपूर्ण इमारत जळून खाक झाली.

नागरिकांची समयसुचकता व प्रशासनाची तत्परता यामुळे जीवितहानी टळली. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास लागले. आगीत परेश शहा यांच्या कपड्याच्या दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर, पेपर विक्रेते संतोष तेलवणे याचे घरही जळून बेचिराख झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये राहणार्‍या एकूण 5 कुटुंबांमध्ये संतोष तेलवणे, वसंत तेलवणे, शेखर तेलवणे, नानचंद शहा, गणेश तेलवणे यांचा समावेश होता. काही भाडेकरू सुद्धा या इमारतीमध्ये राहात होते. 5 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक या इमारतीमध्ये आग लागून काही तासांत संपूर्ण इमारत जाळून खाक झाली. मुरबाड, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या.

अग्निशमन दलाच्या गाड्यांमधील पाणी संपल्याने मुरबाडमधील टँकर मालकांनी तत्परता दाखवत पाणीपुरवठा करून आग विझविण्यास मदत केली. मुरबाडमधील मच्छीमार्केटमधील विहिरीच्या पाण्याचाही वापर करण्यात आला. रस्त्यावर असणार्‍या वाहनांना हटविण्यासाठी मुरबाड मशिदीमधून सूचना दिल्याने रस्त्यातील अडथळे दूर होऊन रस्ता मोकळा करण्यास मदत झाली. मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे, कल्याण प्रांत अधिकारी प्रसाद उकिरडे, आ. किसान कथोरे, तहसीलदार सचिन चौधर, नायब तहसीलदार हनुमान जगताप, नगरपंचायतचे नगराध्यक्ष मोहन सासे, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.