Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार 

प्लास्टिकबंदीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार 

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी 

प्‍लास्टिकमुळे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात  प्लास्टिकवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली. राज्य सरकारने या बंदीच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेले विशेष कृती दल आणि प्‍लास्टिक कचर्‍याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परीणाम आणि त्याचा सर्वसामान्य लोकांवर होणारा दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे स्पष्ट करून न्यायमूर्ती न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने या प्‍लास्टिकबंदीला  स्थगिती देण्यास नकार दिला.

मात्र राज्य सरकार्‍याचा प्लास्टिकबंदीच्या अध्यादेशावर दाद मागण्यासाठी न्यायालयाने व्यापार्‍यांना तीन आठवड्यांची मुदतवाढ देताना याचिकेची पुढील सुनावणी 20 जुलैपर्यंत तहकूब ठेवली. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून राज्यभरात प्‍लास्टिक बंदी करण्याची निर्णय घेतला तशी अधिसूचनाही जारी केली. राज्य सरकारच्या या अधिसूचनेलाच राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेता संघटनांच्या वतीने महाराष्ट्र प्‍लास्टिक मॅन्युफॅक्‍चरर असोसिएशनचे अध्यक्ष रवी जसनानी यांच्या वतीने अ‍ॅड. सुगंध देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने  राज्यात प्लास्टिकबंदी कायम ठेवताना याचिकाकर्त्यांना याचिकेत दुरुस्ती करून प्लास्टिकबंदीच्या अध्यादेशला आव्हान देण्याची मुभा देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.