Thu, Apr 25, 2019 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानाने येऊन लूटमार करणारी टोळी गजाआड

विमानाने येऊन लूटमार करणारी टोळी गजाआड

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:01AMनवी मुंबई: प्रतिनिधी 

विमानाने हवाई प्रवास करत पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली राज्यातील एक्स्प्रेस महामार्गावर भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या नवी मुंबई क्राईंम ब्रॅन्चने आवळल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत वीस गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्याविरोधीत पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांनी दिली. या टोळीने महाराष्ट्रात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टार्गेट केला होता. ही टोळी  एक्स्प्रेस वेवर असलेले नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे आदी शहरांत शस्त्रांचा धाक दाखवून किंवा गुंगीच्या औषधाचा वापर करुन लूटमार करत होती, हेही तपासात उघड झाले आहे. 

गुरुचरणसिंग कर्नालसिंग चाहल (40),अहमदहसन इस्लामउद्दीन शेख (39) व गुलफाम जहीर हसन (38) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. 23 जुलै रोजी वरील चोरटे मुंबई विमानतळावरून दिल्लीला जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी विमानतळ परिसरात सापळा रचला आणि वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता मुंबई - पुणे एक्स्प्रेस महामार्गावर लुटमार प्रकरणासह सात गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ही टोळी दिल्लीवरून प्रत्येक राज्यात विमानाने प्रवास करुन अलिशान हॉटेलमध्ये एक ते दोन तासांचा मुक्काम करुन आपला मार्ग निवडून मोकळी होत होती. महाराष्ट्रात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टार्गेट केला होता. या टोळीने एक्स्प्रेस वेवर असलेले नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे शहरात शस्त्रांचा धाक दाखवून किंवा गुंगीच्या औषधाचा वापर करुन लूटमार करत होती. पत्रकार गिरीष निकम आणि स्टेट बँक ऑफ इंडीयाचे मुख्य प्रबंधक सुधीर जालनपुरे यांना याच टोळीने पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याचे उघड झाले आहे. 

ही टोळी एक्स्प्रेस वेवर लुटमार केल्यानंतर पुन्हा जवळपास असलेल्या एखाद्या हॉटेलवर जाऊन दोन तास मुक्काम करत होती. त्यानंतर मुंबई विमानतळावरुन पुन्हा दिल्ली हवाईप्रवास करुन फरार होत होती. त्यामुळे हवाई मार्गाने प्रवास करणार्‍या लुटमार टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ही टोळी काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्लीतील आपल्या प्रमुखाला देऊन पुढील प्रवासाबाबत विचारणा करुन दुसर्‍या शहरातील महामार्ग टार्गेट करत होती. या टोळीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.त्यांच्याकडून एकूण 9 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कळंबोली, वाशी, नेरुळ, स्वारगेट आदी ठिकाणच्या गुन्ह्यांची उकल या टोळीकडून करण्यात आली.