Tue, Jul 23, 2019 11:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा दिवस

ठाणेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा दिवस

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:11AMठाणे : प्रतिनिधी 

आपली सावली आपली साथ कधी सोडत नाही... असा वाक्प्रचार रूढ आहे,  पण अवकाशात आणि निसर्गात घडणार्‍या घडामोडींवर माणसांचे अजूनही नियंत्रण नाही, त्यामुळे आकाशात घडणार्‍या खगोलशास्त्रीय घडामोडींमुळेच बुधवारी काही क्षण आपली सावली हरवण्याचा अर्थात शून्य सावलीचा दिवस ठाणेकरांनी अनुभवला. ठाणेकरांना ही खगोलशास्त्रीय घटना उलगडून सांगण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, ठाणे आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त  विद्यमाने गावदेवी मैदानात  शून्य सावली शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे  200 विज्ञानप्रेमी  नागरिक उपस्थित होते. 

ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावच्या अक्षांशाइतकी होते, त्या दिवशी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पायाखाली आल्याने काही काळ अदृश्य  झाल्याचा अनुभव येतो. मे महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा शून्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. ठाणेकरांना याबाबत शास्त्रीय माहिती मिळावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 12 वाजून 35 मिनिटांनी सावली काही क्षण दिसेनाशी झाल्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. 

शून्य सावलीचा दिवस महाराष्ट्राच्या विविध भागात मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून अनुभवता येतो, तसेच 28 जुलै रोजीही शून्य सावलीचा दिवस असतो, परंतु आपल्याकडे या काळात पाऊस पडतो, त्यामुळे या दिवसाची अनुभूती घेता येत नाही, असे सोमण यांनी स्पष्ट केले. शून्य सावलीची संकल्पना यावेळी सोमण यांनी सौरघड्याळ आणि सिलिंडरच्या साह्याने ठाणेकरांना स्पष्ट करून सांगितली. उत्तरायण, दक्षिणायन, सूर्य, सूर्यग्रहण याविषयी माहिती  सोमण यांनी यावेळी दिली. पुढच्या वर्षी 26 डिसेंबरला भारतामधून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असल्याचेही सांगितले.  विश्‍वास संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, मराठी विज्ञान परिषदेचे श्रीरंग देशपांडे, साधना वझे, दिलीप गोखले, महेंद्र केळकर उपस्थितीत होते.