Sun, May 26, 2019 13:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेकरांची ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक

ठाणेकरांची ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:17AMठाणे : प्रतिनिधी

कॅशलेस व्यवहार करण्यावर शासन भर देत असले तरी कॅशलेस व्यवहारामुळे अनेकांना फटका बसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगत तसेच इतर मार्गांनी काही भामटे भोळ्याभाबड्या जनतेला गंडवतात. ठाणे पोलीस आयुक्तालयात जानेवारी 2017 ते मार्च 2018 या पंधरा महिन्याच्या काळात तब्बल 836 जणांची ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या फसवणुकीच्या घटनेत भामट्यांनी ठाणेकरांना तब्बल तीन कोटी 50 लाखाचा गंडा घातलाय.

मी तुमच्या खाते असलेल्या बँकेतून बोलतोय हा कॉल्स तुमच्या खात्याची माहिती पडताळणीसाठी करण्यात आला आहे. मला तुमचे खाते क्रमांक आणि क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड पिन क्रमांक कळेल का? अशी विचारणा करणारा कॉल करून बँक खात्याची माहिती मिळवून नंतर ऑनलाईन बँकिगद्वारे फसवणूक करणार्‍यांची टोळीच सध्या मुंबई ठाण्यासह राज्यभरात कार्यरत आहे.  गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठाण्यात बँकेच्या नावाने कॉल करून बँक खात्याची व क्रेडीट/डेबिट कार्डची माहिती मिळवणार्‍या काही टोळ्या कार्यरत असून एकदा का या टोळीच्या हाती बँक खात्याची माहिती लागली की हे भामटे ऑनलाईन बँकिगद्वारे खात्यातील पैशांची अफरातफर करतात.

बँकेची माहिती मिळवणार्‍या व्यक्तींची गोड बोलण्याची पद्धत, इंग्रजीचा भडीमार आणि आपले म्हणणे पटवून देण्याचे कसब यामुळे कुणीही व्यक्ती सहजच त्यांच्या भूलथापांना बळी पडतो. अशा प्रकारे भूलथापा देवून गंडवण्याच्या तब्बल 747 घटना 2017 या वर्षभराच्या कालावधीत घडल्या असून या फसवणुकीच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. तर 2018 या चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 89 जणांची ऑनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.