Tue, Jul 16, 2019 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेकर ‘बुकलेट गाय’चे ‘मिशन मेक इंडिया रीड’

ठाणेकर ‘बुकलेट गाय’चे ‘मिशन मेक इंडिया रीड’

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 11:48PM

बुकमार्क करा

मुंबई : अभिषेक कांबळे

सध्याची तरुणाई सोशल मीडियामध्ये गुरफटली असून ती वाचनापासून दूर गेली आहे. तरुणाईला वाचनाकडे वळवण्यासाठी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये वाचनाचे अ‍ॅडिक्ट निर्माण करण्यासाठी ठाणेकर अमृत देशमुख यार तरुणाने व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक तसेच बुकलेट अ‍ॅपच्या माध्यमातून उपक्रम राबवला आहे. त्याने दीड वर्षात 5 लाख वाचक निर्माण केले असून हा उपक्रम आजीवन राबवण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.

नौपाडा येथे राहणार्‍या 34 वर्षीय अमृतचे शिक्षण बी.कॉम, सी.ए.पर्यंत झाले. तो शेअर बाजारात जॉब करायचा तसेच त्याची प्रॅक्टिसही छान सुरू होती. तो दीड वर्षापूर्वी मित्रासोबत चित्रपट पाहायला गेला. चित्रपट सुरू होण्यापूर्वी ते 15 ते 20 मिनिटे आधी सिनेमागृहात पोहोचले. या वेळेत काय करायचे असा प्रश्‍न दोघांना पडला. त्यावेळी अमृतने तो वाचत असलेल्या एका इंग्रजी पुस्तकाचा सारांश मित्राला कथन केला. मित्राला तो खूप आवडला. त्याने अमृतला असा सल्ला दिला की, तू जसे वाचतोस तसे ते इतरांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण कर. आणि यातूनच ‘मिशन मेक इंडिया रीड’ या अभियानाचा जन्म झाला. मित्राचा हा सल्ला अमृतला खूप आवडला. या मिशनवर काम करण्याचे विचारचक्र सुरू झाले. त्याचे चित्रपटात मन रमले नाही. त्याने इंटरव्हलमध्ये स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने पळ काढून त्वरित वाचलेल्या पुस्तकांचे सारांश लिहून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना पाठवणे सुरू केले. 

या अनोख्या उपक्रमाला सोशल मीडियावर तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका आठवड्यात त्याच्याशी 1000 वाचकांनी संपर्क करून या मिशनचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला टेक्स्टच्या स्वरूपात सुरू झालेली ही अभिनव चळवळ पुढे ऑडिओ क्‍लिपच्या माध्यमातूनही रुजू लागली. मिशन मेक इंडिया रीडच्या माध्यमातून अमृतने गेल्या दीड वर्षात 5 लाख वाचक निर्माण केले आहेत. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने त्याने हे मिशन आजीवन राबवण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी त्याने 2016 मध्ये जागतिक पुस्तक दिनी (23 एप्रिल, शेक्सपिअर यांचा जन्मदिवस) बुकलेट अ‍ॅप वाचकांच्या सेवेसाठी सुरू केले.

वाचनाची चळवळ अधिकाधिक फोफावण्यासाठी त्याने आपली प्रॅक्टिस तसेच जॉब थांबवला आहे. हे मिशन अधिक व्यापक करण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षे केवळ यावर काम करण्याचे त्याने ठरवले आहे. यासाठी तो विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे.

सध्या विविध इंग्रजी पुस्तके व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तसेच बुकलेट अ‍ॅपच्या माध्यमातून इंग्रजीतून वाचकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. अमृतने सध्या रवींद्रनाथ टागोरांची पुस्तके या माध्यमातून इंग्रजीतून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. अन्य भारतीय भाषांतील लोकप्रिय पुस्तके इंग्रजी आणि हिंदीतून वाचकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसेच वाचकांच्या सूचनेनुसार भविष्यात देशातील प्रत्येक भाषेतील पुस्तके वाचकांना मिळणार आहेत.