Sun, Jan 19, 2020 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेमप्रकरणातून ठाण्यात तरुणाची हत्या

प्रेमप्रकरणातून ठाण्यात तरुणाची हत्या

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:35AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

अनैतिक संबंध असलेल्या प्रेयसीच्या सांगण्यावरून मॉर्निंग वॉकला आलेल्या आझादनगर निवासी रामजी छत्रधारी शर्मा याचा टुरिस्ट कारच्या धडकेने अपघात घडवून हत्या केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्यात उघडकीस आली. 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या रामजी शर्मा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कासारवडवली पोलिसांनी प्रियकर आरोपी जयप्रकाश मंगरु चौहान (रा. नळपाडा) याच्यासह प्रेयसी सुमारी सुरेश यादव (40) हिला अटक केली आहे. 

आरोपी महिला सुमारी यादव आणि मृत रामजी शर्मा यांच्यात अनैतिक संबंध होते.सुमारी हिचे आरोपी जयप्रकाश चौहान याच्याशीही अनैतिक संबंध होते. दरम्यान रामजी शर्मा हा सुमारी यादव हिला त्रास देत असल्याची तक्रार सुमारी आरोपी चौहान याच्याकडे वारंवार करत होती. त्यानंतर सुमारी यादव हिच्या सांगण्यावरून चौहान याने शर्मा यास धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार आरोपी जयप्रकाश चौहान याने 18 नोव्हेंबर 2017 रोजी तुलसी हॉटेल्स, ब्रह्मांड येथे पाहटे साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या रामजी शर्मा याला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. 

शर्माला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासात हा अपघात नसून अपघाती हत्या असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता कार विरुद्ध दिशेने असल्याचे निष्पन्न झाले. तर दुसरीकडे पलीकडच्या रस्त्यावर आरोपी महिला सुमारी ही घटनास्थळी आपल्या पतीसह उपस्थित होती. कासारवडवली पोलिसांनी प्रथम आरोपी कारचालक जयप्रकाश चौहान याला 25 डिसेंबर रोजी अटक केली. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. 

सदर गुन्हा हा प्रेयसी सुमारी हिच्या सांगण्यावरून केला असून दोघांत अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान शर्मा याचा मृत्यू झाल्याने कासारवडवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी सुमारी यादव हिलाही अटक केली. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल सीडीआर तपासून, सीसीटीव्ही फुटेज तपासून या हत्येच्या कटातील प्रेयसी व प्रियकर यांना बेड्या ठोकल्या.