Wed, Jul 24, 2019 14:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्नाळा किल्‍ल्‍यावरील विहिरी आजही ठरताहेत उपयुक्‍त

अर्नाळा किल्‍ल्‍यावरील विहिरी आजही ठरताहेत उपयुक्‍त

Published On: Apr 10 2018 8:37PM | Last Updated: Apr 10 2018 8:37PMठाणे : अमोल कदम 

पालघर जिल्ह्यातील अर्नाळा किल्ला हा किल्ला जलदुर्ग प्रकारात येतो. किल्याच्या चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने  व्यापलेला आहे. याच किल्याच्या शेजारी कोळी बांधवांचे गाव असून पिण्याच्या पाण्याकरिता गावातील नागरिक आजही या किल्‍यावरील विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

अर्नाळा शहरापासून समुद्र किनारपट्टी लागली की, अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर समुद्राच्या पाण्याच्या मधोमध इतिहास कालीन अर्नाळा किल्ला आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाताना प्रथम कालिका माता देवीचे मंदिर लागते. किल्ल्याचा परिसर सुमारे दहा एकर जमिनीने व्यापलेला आहे. तटबंदी देखील अजूनही मजबूत असून ह्या किल्ल्याला छुपे अनेक दरवाजे आहेत. मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर किल्याच्या आत मध्ये किल्याचा राजवाड्याच्या धान्यभंडाराचा परिसर लागतो. तसेच आतमध्ये दत्ताचे, शंकराचे, गणपतीचे मंदिर आहे तसेच दर्गा देखील आहे. महत्वाचे म्हणजे ह्या किल्यावरती येण्याकरिता बोटीच्या साह्याने यावे लागते.  किल्याच्या चारही बाजूला समुद्राचे खारे पाणी असून, किल्याच्या आतील भागात गोड पाण्याच्या सुमारे चार विहिरी आहेत. अष्टकोनी तलाव देखील आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीचे पाणी इतिहास काळात पीण्याकरिता वापरत होते. ती परंपरा आजही कायम असून, आजही विहिरीचे पाणी अर्नाळा किल्याच्या बाजूला असलेल्या कोळी बांधवाना प्यावे लागत आहे. गावात कुठलीही चांगल्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे गोड पाण्याच्या विहिरी गावातील नागरिकांनी जपून ठेवल्या असून आजही या विहिरी येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवतात.

अर्नाळा शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अर्नाळा किल्ला आहे. या किल्ल्याच्या बाजूला लागून अर्नाळा गाव आहे. गावात सुमारे तीनशे घर आहेत. तर या गावाची लोकसंख्या चार ते पाच हजार इतकी आहे. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. परंतु या गावात जाण्याकरिता बोटीच्या साहाय्याने जावे लागत असल्याने घरातील दैनदीन गरजेच्या वस्‍तूंपासून सर्वच गोष्टीकरिता बोटीचा वापर करूनच प्रवास करावा लागतो. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून, या किल्‍यावरील असलेल्‍या गोड्‍या पाण्याच्या विहिरींचे पाणी आटत चालले आहे. परिणामी स्‍थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्‍यावे लागत आहे. त्‍यामुळे सरकारच्या वतीने अर्नाळा शहर समुद्र किनारपट्टी ते अर्नाळा किल्ला असा पूल बांधण्यात आला तर जवळच्या गावातील नागरिकांना ये-जा करणे खूप सोपे होईल आणि या गावांमधील नागरिकांना  वसई- विरार महानगर पालिकेचे पिण्याचे  स्वच्छ पाणी मिळेल.

अर्नाळा किल्याच्या पूर्वेला काही अंतरावर्ती  एक गोल आकाराचा बुरुज आहे.  ह्या बुरुज मधून एक भुयारी मार्ग होता आणि या मार्गातून इतिहास काळात वसई किल्यापर्यंत जाता येत होते. असे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या बुरुजाच्या येथे भुयारी मार्गाचे अवशेष देखील आहेत परंतु हा भुयारी मार्ग समुद्राच्या प्रवाहामुळे बंद झाला असल्याचे देखील नागरिक सांगत आहेत. 

अर्नाळा किल्यावर्ती कसे पोहोचाल- 

मुंबई येथून रेल्वेने विरार या रेल्वे स्थानक येथे उतरून पश्चिमेला जाऊन वसई, विरार महानगर पालिकेच्या बसने अवघ्या प्रति बारा रुपये तिकीट दरात अर्नाळा शहराच्या समुद्र किनारपट्टी पर्यंत जाता येते. तिथून बोटने प्रति व्यक्ती पंधरा रुपये देऊन अर्नाळा किल्ला येथे जात येते. अवघ्या पंधरा रुपयांमध्ये किल्ल्याच्या परिसर संपूर्ण बघून परत येता येते. खाजगी वाहनाने अर्नाळा शहरापर्यंत गेल्यानंतर वाहने समुद्राच्या किनाऱ्याला लागुनच पार्क करून ठेवावी लागतात. त्यानंतर फुडें बोटीने प्रवास करावा लागतो.