Mon, Jun 24, 2019 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेकर वाहनांच्या आता कल्याणवार्‍या

ठाणेकर वाहनांच्या आता कल्याणवार्‍या

Published On: Feb 04 2018 2:22AM | Last Updated: Feb 04 2018 2:18AMठाणे : खास प्रतिनिधी 

वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम हे  ठाण्यातील  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून बंद करण्यात आले आहे. हे नूतनीकरण आता कल्याणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून होणार आहे. याचा ठाणेकरांना फटका बसणार आहे.

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम 1 फेब्रुवारीपासून ठाणे आरटीओ कार्यालयातून बंद करण्यात आले आहे. यापुढे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरिता वाहन तपासणी करावयाची असेल त्यांनी त्या वाहनांबाबत तारीख नक्की करुन ते वाहन उपप्रादेशिक  परिवहन कार्यालय वाडेघर कल्याण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे तपासणीकामी सादर करावे किंवा कोणत्याही लगतच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध असलेल्या इतर कार्यालयात वाहन तपासणीसाठी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

उच्च न्यायालयाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत तपासणीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व वाहनचालकांनी दखल घ्यावी, तसेच सर्व वाहतूकदार संघटनांनी आपल्या सभासदांना कळवावे, असे आवाहनही ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केले आहे.