Tue, Apr 23, 2019 18:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांनी उचलली लहान मुलीसह दुचाकी

पोलिसांनी उचलली लहान मुलीसह दुचाकी

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:47AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे महापालिका परिसरात एका महिलेने चुकून नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी केल्यानंतर तिच्यासमोरून वाहतूक पोलिसांनी गाडी टोईंग करून नेली. यावेळी पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाईची सूचना दिली नाही. उलट ही महिला गाडी मागण्यास गेल्यानंतर टोईंग व्हॅनमध्ये बसलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याने गाडी देण्यास नकार देत महिलेशी हुज्जत घातली. त्यामुळे या महिलेच्या सोबत असलेला तिच्या तीन ते चार वर्षाच्या लहान मुलाला रडू कोसळले.

मालाडमध्ये लहान मुलासह गाडीत बसलेल्या महिलेची कार टोईंग केल्यावरून वाहतूक पोलिसांवर टीकेची झोड उठलेली असताना असाच असंवेदनशीलपणा ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी मेगाफोनद्वारे सूचना देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असले तरी अद्याप त्याचा अवलंब ठाण्यात केला जात नाही. 

ही महिला महापालिका परिसरात गाडी उभी करून रस्त्याशेजारी कामासाठी गेली असताना वाहतूक पोलिसांनी थेट त्यांच्यासमोरून गाडी उचलून नेण्यास सुरुवात केली. यावेळी या महिलेने आक्षेप घेतल्यानंतर गाडीत बसलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याने तिच्याशी हुज्जत घातली. 

या भागात उभ्या असलेल्या काही पत्रकारांनी त्याबद्दल आक्षेप नोंदवल्यानंतर या महिलेची गाडी देऊन तिचा वाहन परवाना जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे ही महिला घाबरून गेली होती तर तिच्यासोबतची तिची लहान मुलगीही रडू लागली. तरी देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.