होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते

ठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:18AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गट आणि 106 गणांच्या निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 452 जणांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 248 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भिवंडीतील खोणी गटातून काँग्रेसच्या महिला उमेदवार मीना नईम यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे मतदानापूर्वीच खाते उघडले आहे. 

ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी, तर पंचायत समितच्या 106 गणांसाठी 13 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याची मुदत होती. झेडपीच्या गटांमधील 144 तर, पंचायत समितीच्या गणांमधून 291 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात 53 गटांसाठी 114  उमेदवार तर पंचायत समितीच्या 106 गणांसाठी 134 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. 

त्यातच भाजप-शिवसेनेला धक्का देत काँग्रेसने चमत्कार घडवत पहिली जागा जिंकली. भिवंडी 2 मधील खोणी (39) या गटातून काँग्रेस उमेदवार मीना नईम यांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात राहिला नाही. सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. त्याची अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. या एक जागेमुळे काँगे्रसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच आपले खाते उघडले आहे.