Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जि. प. अध्यक्षपद; भाजपचीही मोर्चेबांधणी

ठाणे जि. प. अध्यक्षपद; भाजपचीही मोर्चेबांधणी

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:47AM

बुकमार्क करा
भिवंडी ः वार्ताहर 

ठाणे जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे. असे असतानाही शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी सतर्क झाले असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे. ही निवडणूक पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार कपिल पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला सदस्यासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदाची लॉटरी ही भिवंडीतील दीपाली पाटील अथवा शहापूरमधील मंजुषा जाधव यांच्यापैकी कोणाला लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यातच विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात अर्थकारण व विविध पदे देण्याचे आश्वासन दिले जात असल्याने तूर्तास जि. प. सदस्य मूक भूमिका बजावत आहेत. अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडते, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने सदस्यांना कुडकुडणार्‍या थंड हवेच्या ठिकाणी नेल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत अर्थकारण मोठ्या प्रमाणात होवून फुटीर सदस्यांना 1 कोटी रुपये व महत्त्वाचे सभापतिपद दिले जाणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.