Mon, Aug 19, 2019 14:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुर्दाड आरोग्य यंत्रणेने घेतला चिमुकल्याचा बळी

मुर्दाड आरोग्य यंत्रणेने घेतला चिमुकल्याचा बळी

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 1:12AMठाणे : नरेंद्र राठोड

मुंबई.... स्वत:ला देशाची आर्थिक राजधानी म्हणवते खरी. पण इथे जीव खूप स्वस्त आहे. आणि माणुसकी खूप महाग. अगदी मोठेच संकट आले तर माणुसकीचे कढ वगैरे येतात. एरव्ही चलता है वृत्तीचा अनुभव पावलोपावली येत असतोच.  मुर्दाड वैद्यकीय यंत्रणा हे या शहराचे आणखी एक मोठे दुखणे. ही यंत्रणा कधी कधी इतकी निष्ठुर होते की, क्रूर हा शब्दही सौम्य वाटावा. हाच मुर्दाडपणा, हीच क्रूरता एका सात वर्षाच्या बालकाच्या जिवावर बेतली. रेबीजवर आमच्याकडे औषध नाही, आमच्याकडे बेड उपलब्ध नाही, अशी थातुरमातुर कारणे मुंबईभरच्या यंत्रणेने दिली. कुणीही त्याला दाखल करुन घेतले नाही. आणि सात तास वेदनांनी कळवळणार्‍या एका कोवळ्या जिवाने आपल्या आई वडिलांच्या डोळ्यादेखत प्राण सोडला.       

अर्णव संदीप सुर्वे हा कळव्यात राहणारा 7 वर्षीय दुसरीत शिकणारा चिमुकला. डान्स व खेळात अत्यंत निपुण असलेल्या अर्णव याला सगळ्याच मुलांप्रमाणे मामाचे गाव खूप आवडायचे. अर्णवचे वडील मुंबई वाहतूक पोलीस दलात आहेत. ते 26 डिसेंबर रोजी त्याला आजोळी खोपोलीतील चिंचवली येथे सोडून आले.  तिथे अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अर्णवचा चावा घेतला. अर्णवच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्या आजी-आजोबांनी त्यास त्वरित खोपोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे योग्य औषधे उपलब्ध नसल्याने त्यास कळव्यात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कळवा येथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली. मात्र 14 जानेवारी रोजी त्याची प्रकृती पुन्हा प्रकृती बिघडली अन् त्यास पुन्हा इस्पितळात दाखल करावे लागले. कळव्यातल्या खासगी रुग्णालयाने त्यास डेंग्यू झाल्याचे कारण सांगत मोठ्या इस्पितळात दाखल करण्यास सांगितले. अर्णवच्या बाबांनी त्याला मुलुंडच्या फोर्टिज इस्पितळात 18 जानेवारी रोजी दाखल केले. मात्र येथे देखील अर्णवला नेमके झालेरय तरी काय, याचा खुलासा न करता त्याला रेबीज झाल्याची लक्षणे दिसत असल्याचे सांगून कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. अर्णवला कस्तुरबात हलवण्यात आले. मात्र त्या हॉस्पिटलवाल्यांनी अर्णवची कुठलीही टेस्ट न करता त्याला रेबीज झाल्याचे सांगत रेबीजवर उपचार सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून त्याला नायर हॉस्पिटलात नेण्याचा सल्ला दिला. 

  अर्णवला नायर हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र तिथेही त्याला रेबीज झाल्याचे सांगत अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला. अर्णवच्या वडिलांच्या मिन्‍नतवार्‍यांनंतरही बेड उपलब्ध नाही, असे कारण हॉस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला पुढे केले. नंतर आमच्याकडे आयसीयू नाही, रेबीजवरील उपचार उपलब्ध नाही, अशी विविध कारणे सांगत अर्णवला दाखल करून घेण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. 

  पोलीस अधिकार्‍यांच्या विनंतीनंतर नायरच्या डॉक्टरांनी अर्णव यास दाखल करण्यास संमती दर्शवली. सात तास अर्णव रुग्णवाहिकेतच कळवळत होता. पहाटे साडेचार वाजता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र काही वेळातच हॉस्पिटलचा कर्मचारी एक फॉर्म घेऊन आला. उपचाराआधी आम्ही या फॉर्मवर सही घेतो, अशी बतावणी त्या कर्मचार्‍याने केली. अर्णवच्या वडिलांनी त्या फॉर्मवर सही केली अन् काही वेळातच अर्णवने प्राण सोडला. 

माझा बाळ रात्री 10 ते पहाटे साडेचारपर्यंत उपचाराअभावी कळवळत होता. डॉक्टरांनी त्याच्यावर दया दाखवली नाही. बाळाचा जीव गेल्यानंतर देखील तब्बल अडीच तास डॉक्टरांनी तो गेल्याचे आम्हाला सांगितले नाही. मी माझ्या बाळाच्या निर्जीव शरीरासोबत तब्बल अडीच तास बोलत होतो. त्याला उठवत होतो, तुला हे घेऊन देईन, ते घेऊन देईन असे सांगत होतो. परंतु अखेर माझे बाळ उठलेच नाही.
 

- संदीप मदनराव सुर्वे, अर्णवचे वडील