होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे झेडपीत भगवा इतिहास 

ठाणे झेडपीत भगवा इतिहास 

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:27AM

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषदेमध्ये इतिहास घडविला आणि या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकवला. शिवसेनेने 53 पैकी 26 जागा जिंकत भाजपचा पुरता धुव्वा उडविला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला प्रखर विरोध करणार्‍या शहापूरमधील शेतकर्‍यांनीही भाजपचे गाजर नाकारत शिवसेेनेवर विश्‍वास दाखविला. पाच पंचायत समित्यांपैकी चार समित्यांवर शिवसेनेचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

ठाणे जिल्हा विभाजनानंतर झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. भिवंडीत तर सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार, नगरसेवकांची फौज घेऊन शिवसेना स्टाईलने प्रचार केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन भाजपाचा उधळणारा वारू रोखण्याचे काम केले. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असताना शिवसेनेने मारली मुसंडी हे त्याचे द्योतक आहे. दुसरीकडे भाजप खासदार कपिल पाटील यांनी एकला चलो रेची भूमिका घेऊन इतर पक्षांना गृहीत धरण्याचे काम केले. त्याचबरोबर पक्षातील इतर आमदारांनाही फारसे महत्व दिले नाही. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर जिल्ह्यातील आमदार, नगरसेवकांनी प्रचाराची धूरा सांभाळली.परंतु ठाणे महापालिकेप्रमाणेच स्थानिक नेत्यांना डावलून खासदारांनी प्रचार, उमेदवार रेटले आणि अपेक्षित पराभव झाला. भाजपला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागले. 

भिवंडीतील 20 जागांपैकी फक्त 6 जागांवर कमळ फुलले. यातूनच भाजपबाबतची नाराजी स्पष्ट होते. शिवसेनेला 10 जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा झालेला पराभव हा सेनेच्या जिव्हारी लागला आहे. ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकविताना शिवसेनेने शहापूर पंचायत समितीवर निर्विवाद बहुमत मिळविले. 28 जागांपैकी 18 जागा शिवसेनेने जिंकल्या. आमदार पांडुरंग बरोरा यांच्या राष्ट्रवादीला फक्त 6 जागा जिंकता आल्या. भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. आरपीआयने खाते उघडले. खासदार कपिल पाटील यांनी ज्या भिवंडी तालुक्याच्या जिवावर झेडपीवर कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नाला भिवंडीतील मतदारांनी नाकारले. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा कशी आहे, याची झलक दाखविली आहे. भिवंडीतील 40 गणांपैकी 19 जागांवर शिवसेना तर भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या. काँग्रेस दोन तर राष्ट्रवादीला एक जागेवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते खाते उघडले. दोन जागांचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहे. या समिश्र निकालामुळे पंचायत समिती सभापतीसाठी रस्सीखेच होणार आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांमुळे शिवसेनेचा भगवा भिवंडी पंचायत समितीवर झडकण्यास कोणतीही अडचण नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील 8 जागांपैकी पाच जागा जिंकून शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.

भाजपला फक्त एक जागा मिळाली. दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून एकाप्रकारे शिवसेनेला बळ दिले आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये मात्र 12 जागांपैकी पाच जागा जिंकून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनला आहे. शिवसेनेला चार आणि राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्याने कल्याणचा सुभेदार हा सेना-राष्ट्रवादी आघाडीचाच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडचा गड आबाधित राखण्यास यश मिळविले. 16 जागांपैकी 11 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला. मात्र त्यांचा खंदा समर्थक तथा ठाणे जिल्हा मध्यवर्धी बँकेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराव पवार यांच्या मुलाने त्यांचा पराभव केला. दुसरीकडे सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या पत्नीचा पराभव झाला.