Thu, Jun 27, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे- वसई-कल्याण जलवाहतुकीस मंजुरी

ठाणे- वसई-कल्याण जलवाहतुकीस मंजुरी

Published On: Apr 25 2018 2:24AM | Last Updated: Apr 25 2018 2:08AMमुंबई : प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  वसई-ठाणे-कल्याण या 54 किमी लांबीच्या जलवाहतूक मार्गाला तसेच कोलशेत येथे मल्टीमोड ट्रान्सपोर्ट हब व 9 ठिकाणी जेट्टी बांधून  त्यासाठी  सुविधा पुरविण्यास  मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी  661 कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वस्त व पर्यावरणपूरक  पर्याय 

वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) व कल्याण  या ठिकाणी जेट्टी बांधून  आवश्यक त्या  सुविधा पुरविण्यात येणार आहेत.  जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी), महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका  हे काम संयुक्तपणे करणार आहे. त्यासाठी विशेष हेतू वाहन (एसव्हीपी) स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक समस्येला पर्याय म्हणून पर्यायी, स्वस्त आणि पर्यावरणपूरक अंतर्गत जलवाहतुकीला मान्यता देण्यात आली आहे.

रस्त्यावरील वाहतूक 20 टक्क्यांनी घटणार

वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली  (ठाकुर्ली) व कल्याण या भागातून ही जलवाहतूक होणार आहे. यामुळे रस्त्यावरील रहदारीचा 20 टक्के भार हलका होणार आहे. जलमार्गाचा वापर केल्याने 33 टक्के इंधन बचत आणि 42 टक्के प्रदूषणास आळा बसणार आहे. मेरी टाईम बोर्ड, ठाणे, मिरा- भाईंदर, वसई- विरार, भिवंडी - निजामपूर, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका इत्यादी संस्थांची कंपनी स्थापन करुन त्यासाठी संयुक्त करार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे.

32 किलोमीटर किनार्‍यातुन वाहतुक ठाण्यातील वाहतुकीचा ताण कमी

ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे एम. एम .आर.  रिजन च्या मध्यभागी असल्याने सध्या इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. मुंबई शहर, मुंबई पोर्ट ट्रस्ट व जे.एन.पी.टी  येथुन येणारी वाहतूक ठाण्यामधून पश्चिम द्रूतगती मार्गाने गुजरातकडे आणि पूर्व द्रूतगती मार्गाने नाशिक, मध्यप्रदेश, आग्रा याकडे जातात.  त्यामुळे ठाणे शहरात बरोबरच मिरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी - निजामपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई  महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी होते.  यावर पर्याय म्हणून वेळ आणि इंधनाची बचत होऊन वाहतुकीसाठी 32 किलो मिटरचा लांबीचा किनारा उपलब्ध असल्याने त्याचा अंतर्गत जल वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे. या बैैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील, अदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्यासह अन्य मंत्री , लोकप्रतिनिधी व अधिकारी  उपस्थित होते.

Tags : Thane Vasai Kalyan, ratification, water transport,