Thu, Apr 25, 2019 16:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थिनीला बेशुद्ध करून  अज्ञाताने केला बलात्कार

विद्यार्थिनीला बेशुद्ध करून  अज्ञाताने केला बलात्कार

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:31AMठाणे : प्रतिनिधी

खासगी क्लासेसमधून घरी जाणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अज्ञाताने बोलण्यात गुंतवून ठेवत तिला रुमालाने गुंगीचे औषध लावत बेशुद्ध करून निर्जन ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.   मानपाडा ठाणे येथे राहणारी 17 वर्षीय विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास मनोरमानगर येथील क्लासेसमधून घरी परतत होती. यावेळी एका 20 ते 22 वर्षाच्या अज्ञात तरुणाने तिच्या जवळ येत वेळ विचारली. यावेळी बोलण्यात गुंतवून तरुणाने पीडितेचे तोंड गुंगीचे औषध लावलेला रुमालाने दाबले.

त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाल्यावर नराधमाने मानपाडा येथील गुरुकुल शाळेच्या गल्लीत नेवून तिच्यावर बलात्कार करून पोबारा केला. यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार घाबरून कुणालाही सांगितला नाही. मात्र मासिक पाळी थांबल्याने तिला 12 फेब्रुवारी 2018 रोजी मानपाडा येथील डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली. मुलीला त्वरित उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख करीत आहेत.