Sun, Mar 24, 2019 17:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीच्या विद्यार्थिनीची ठाण्यामध्ये आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीची ठाण्यामध्ये आत्महत्या

Published On: Feb 23 2018 1:43AM | Last Updated: Feb 23 2018 1:43AMठाणे : प्रतिनिधी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेच्या तणावातून रचना सूर्यकांत शिंगे या 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील बाळकूम येथे गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नौपाड्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेत शिकणारी रचना बाळकूमच्या नर्मदा निवास येथे दुसर्‍या मजल्यावर आपल्या पालकांसोबत राहत होती. तिचे वडील सूर्यकांत हे खासगी नोकरी करतात. तर आई ब्युटीपार्लर चालविते. त्यामुळे आई दुकानात तर वडील कामावर आणि लहान 12 वर्षीय भाऊ बाहेर गेलेला असतानाच सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रचना हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

तिचे चुलते अनिल शिंगे  सकाळी काही कामानिमित्त आले असता त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला पण कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना रचना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. रचनाला ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रचना दहावीच्या परीक्षेमुळे तणावाखाली होती, असे तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख करीत आहेत.