Fri, Apr 26, 2019 15:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळा संचालकाकडून 18 विद्यार्थ्यांना मारहाण

शाळा संचालकाकडून 18 विद्यार्थ्यांना मारहाण

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:45AMठाणे : प्रतिनिधी

नृत्याच्या सरावासाठी वर्गातील बाकांची हलवाहलव करताना झालेल्या आवाजामुळे झोपमोड झाल्याचा मनात राग धरून ठाण्यातील गौतम प्राथमिक माध्यमिक हिंदी-इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थापिकांनी 18 विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी गुरुवारी विद्यार्थी व पालकांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

ठाण्यातील पॅरेडाईज इमारतीच्या शेजारी हिंदू मिशन एज्युकेशन सोसायटीचे गौतम प्राथमिक माध्यमिक हिंदी इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालय आहे. बुधवारी सायंकाळी शाळेतील 5 ते 10 चे सुमारे 18 विद्यार्थी हे नृत्याचा सराव करीत होते. यावेळी वर्गातील बाकांची हलवाहलव केली आणि त्याचा आवाज झाला. याचा त्रास शाळेच्या इमारतीतच राहणार्‍या संस्थापिका शिल्पा गौतम यांना होऊ लागला. त्यांनी वर्गात धाव घेऊन त्या मुलांना ओरडल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर काही मुलांचे डोके भिंतीवर आपटले, मुलांना अर्वाच्च्य शिविगाळ केली. 

त्यावरही समाधान झाले नाही म्हणून शिल्पा गौतम यांनी फायबरच्या बांबूने मुलांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर मारहाण केली. यानंतर 10 वीतील काही मुलांनी  जवळच असलेल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि झालेल्या  प्रकार पोलिसांना सांगितला.  या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी पीडित पाल्यांच्या पालकांनी झालेल्या घटनेबाबत संस्थाचालकांनी मुलांची माफी मागावी, एवढी साधी मागणी केली व ते आपापल्या घरी निघून गेले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरूवारी विद्यार्थी शाळेत गेले असता संस्थाचालकांनी त्यांची माफी तर मागितली नाहीच उलट परिक्षेत नुकसान  करण्याची धमकी त्यांनी विद्यार्थ्यांना भरली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पालकांनी आपापल्या पीडित मुलांसह पुन्हा ठाणेनगर पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची रितसर तक्रार केली आहे. त्यानुसार सर्व मुलांची सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानुसार रात्री शाळेच्या संचालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू होती.