Sat, Jul 20, 2019 10:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे, रायगडने थकवले महावितरणाचे ७०० कोटी

ठाणे, रायगडने थकवले महावितरणाचे ७०० कोटी

Published On: Sep 06 2018 1:55AM | Last Updated: Sep 06 2018 1:43AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

शासकीय कार्यालयांसह घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकसह उच्चदाब वीज पुरवठा घेणार्‍या 5 लाख 22 हजार 752 ग्राहकांनी महावितरणाचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन महिन्यांत विजचा पुरेपूर वापर करून या ग्राहकांनी महावितरणाचे 689.93 कोटी रुपये थकवले. यामध्ये वीजचोरीच्या रकमेचा समावेश नाही. हा आकडा महावितरणाच्या इतर विभागाचा विक्रम मोडणारा ठरला आहे. यामध्ये राजकीय व्यक्तींसह महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा विभाग, पोलीस, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांचा ही समावेश आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शिमगा करणार्‍या ग्राहकांनी  महावितरणाला व्हेंटिलेटरवर आणून ठेवले आहे. आता थेट दोन महिन्यांचे वीज बिल थकल्याने त्यांची यादी तयार करण्याचे काम महावितरणाने हाती घेतले आहे. 

महावितरणाच्या भांडूप विभागासह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 5 लाख 22 हजार 752 घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकसह उच्चदाब ग्राहकांनी विजेचा वापर करून बिल थकविण्यात विक्रम केला आहे. गेल्या दोन महिन्यांत या मुलुंड, भांडूपसह रायगड आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत 689.93 कोटी रुपये या ग्राहकांनी थकवल्याने महावितरण अडचणी आले आहे. घरगुती 4 लाख 23 हजार 946 ग्राहकांकडे 119.7 कोटी, व्यावसायिक 77 हजार 410 ग्राहकांकडे 49.76 हजार, औद्योगिक 6652 ग्राहकांकडे 9.71 कोटी आणि इतर 14 हजार 744 ग्राहकांकडे 122.98 कोटी तर उच्चदाब वीजपुरवठा घेणार्‍या 330 मोठ्या कंपन्या, कारखान्यांकडे 388.21 कोटी रुपये थकबाकी आहे. 

दोन महिन्यांपर्यंत अशा थकीत वीजग्राहकांचा पुरवठा खंडित केला जात नाही. मात्र त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते. शासकीय कार्यालयांना वीज बिलची रक्कम मंजूर करण्यासाठी सहा टेबलवर निस्ती फिरवावी लागते. काही कार्यालयात अधिकारी बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 15 दिवसाहून अधिक काळ घेतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांचे बिल थकल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.