Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदच्या शार्पशूटरचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात ठाणे पोलीस

दाऊदच्या शार्पशूटरचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात ठाणे पोलीस

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMठाणे : प्रतिनिधी

दाऊद इब्राहिम गँगचा शूटर नईम खान याच्या गोरेगाव येथील बांगूर नगरातील घरातून एके 56 रायफलसह शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने जप्त केल्यानंतर हा शस्त्रसाठा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला गेला होता, याचा तपास ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, या शस्त्रसाठ्याबाबत आपल्याला माहिती नसल्याची भूमिका नईम खानच्या पत्नीने घेतली आहे. त्यामुळे शस्त्रसाठ्याबाबत नईम खान यालाच माहिती असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगचा कुख्यात शार्प शूटर खान याच्या मुंबईतील बांगूर नगरमधील घरातून एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी हस्तगत केला. 

खान हा सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असून पोलिसांनी त्याची पत्नी यास्मिन नईम खानला अटक केली आहे. यास्मिन सध्या ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस कस्टडीत असून ती पोलिसांना तपासात कुठलेही सहकार्य करीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेली रायफल आणि इतर शस्त्रसाठा माझ्या लग्नाच्या आधी पासूनचा असून मला त्याबाबत काहीही माहिती नाही, असा जबाब यास्मिन पोलिसांना देत आहे. त्यामुळे या शस्त्रसाठ्याबाबत खानची चौकशी करणे गरजेचे झाले असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  नईम याने एके 56 रायफल आणि इतर शस्त्रसाठा कोठून मिळवला? तो या शस्त्रसाठ्याचा कुठे उपयोग करणार होता? याचा तपास ठाणे पोलीस करणार आहेत.