Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे: पोलिसांनी पकडले एके 56 रायफलसह शस्त्रसाठा

ठाणे: पोलिसांनी पकडले एके 56 रायफलसह शस्त्रसाठा

Published On: Jul 07 2018 4:33PM | Last Updated: Jul 07 2018 4:33PMठाणे : खास प्रतिनिधी

कुख्यात दाऊद गँगचा सदस्य नईम फईम खान याच्या घरातून ठाणे खंडणी विरोधी पथकाने एके 56 रायफल, 3 मॅग्झीनस, 108 जिवंत काडतुसे, 2 पिस्टल असा शस्त्रसाठा जप्त केला असून त्याची पत्नी यास्मीन नईम खान हिला शनिवारी अटक करण्यात आली आहे. नईम खान हा सध्या ठाणे कारागृहात आहे.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहितीवरून 5 जुलै रोजी जाहिद अली शौकत काश्मीरी (47) आणि संजय बिपीन शॉफ (47) या आरोपींना ठाण्यातील साकेत रोड येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच पाच ग्रॅम कोकीन जप्त करण्यात आला. त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या चौकशीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड  नईम खान याच्या घरी एके 56 रायफलसह शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी गोरगांव येथील भगतसिंगनगर, क्रांती चाळीत झडती घेऊन हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यावेळी त्याची पत्नी यास्मीन खान हिलाही अटक करण्यात आली. आरोपी नईम खान हा गँगस्टर छोटा शकील याच्या सांगण्यावरून इक्बाल अत्तरवाला याची हत्या करण्यासाठी आला असताना रंगेहाथ पकडला गेला होता. त्याच्यासह अन्य आरोपी ठाणे कारागृहात आहेत.