Wed, Apr 24, 2019 12:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धडाकेबाज परमबीर सिंग!

धडाकेबाज परमबीर सिंग!

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 12:51AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीचे संकेत गृहविभागाने दिले होते. 1988 सालच्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले परमबीर सिंग यांनी 2015 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली होती. सिंग यांनी ठाण्यात सुरवातीपासूनच धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात करून ठाणे पोलिसांना देशपाळीवर नाव लौकिक मिळवून दिला. ठाण्यात प्रचंड प्रमाणात फोफावलेल्या सोनसाखळी चोरी सारख्या गुन्ह्यांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात आळा आणला. सोनसाखळी चोरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे चोरटे जामीन मिळवून लागलीच सुटतात अन पुन्हा चोर्‍या करतात हे लक्षात आल्यानंतर अशा चोरट्यांवर संघटित गुन्हेगारी कायदाअंतर्गत कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिंग यांनी घेतला. त्यामुळे चोरट्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जामीन मिळणे मुश्कील झाले अन साहजिकच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर मोठा अंकुश बसला. 

त्याचबरोबर 2 हजार कोटींचे इफेड्रिन अमली पदार्थ, मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर प्रकरण, बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण, 11 कोटींचा चेकमेट दरोडा प्रकरण, पेट्रोल पंप भेसळ घोटाळा, हाय प्रोेफाईल सीडीआर घोटाळा, दाऊद गँग खंडणी प्रकरण आदी घटनांचा निडरपणे तपास सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करून ठाणे पोलिसांनी राज्यात अग्रक्रम पटकावला. सिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या बड्या कारवाईचे कौतुक सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही राजकीय गटातून करण्यात आले. अशाच धडाकेबाज कारवायांमुळे परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणे निश्चित असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी सूत्रे फिरली आणि सिंग यांच्यावर राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातील कायदा सुव्यवस्था विभागाची जबाबदारी सोपवण्याचे निश्चित झाले. सिंग आता अपर पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) पदी कार्यभार सांभाळतील.