Wed, Jul 24, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे, नवी मुंबई सीपींची कोणत्याही क्षणी बदली

ठाणे, नवी मुंबई सीपींची कोणत्याही क्षणी बदली

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:24AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारने नुकत्याच आयजी, डीआयजी, एसपी, डीसीपी दर्जांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह 120 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. आता अ‍ॅडिशनल डीजी (अतिरिक्त पोलीस महासंचालक) आणि स्पेशल आयजी (विशेष पोलीस महानिरीक्षक) दर्जाच्या सुमारे 18 ते 22 उच्च पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याची अधिकृत यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

बदली होऊ घातलेल्या अधिकार्‍यांत ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, एसीबी, महामार्ग, दहशतवादविरोधी पथक, कायदा-सुव्यवस्था प्रमुखांचा समावेश आहे.  ठाण्याचे पोलीस आयुक्त  परमबीर सिंग यांची आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था किंवा एसीबीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर ठाणे पोलीस आयुक्त पदावर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसाळकर यांची वर्णी लागणार असून शिक्कामोर्तब झाले आहे. 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांचीदेखील बदली करण्यात येणार असून त्यांच्या जागी राज्य सीआयडीचे प्रमुख संजय कुमार सिंग यांची वर्णी लागेल. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांची एसीबीला किंवा महामार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर बदली होऊ शकते. त्याच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन येऊ शकतात. अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी वर्णी लागू शकते. गृह विभागाच्या मुख्य सचिवपदी असलेले रजनीश सेठ यांचे नाव एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर घेतले जात आहे. 

दहशतवादीविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांचीही बदली होण्याचे संकेत आहेत. या व्यतिरिक्त काही स्पेशल आयजींचाही बदली प्रक्रियेत समावेश असल्याचे समजते. याशिवाय केंद्रात प्रतिनियुक्तीवर राज्यातील 18 उच्च पोलीस अधिकारी गेले आहेत. त्यामध्ये डीजी रँकचे मीरा बोरवणकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक दर्जाचे  सदानंद दाते, विनित अग्रवाल, निखील गुप्ता, शिरीष जैन, राजेश मोर, सुप्रिया पाटील-यादव, डी.आर.कुलकर्णी यांचा समावेश आहे.