Sun, May 26, 2019 11:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे महापालिकेची चोरीला गेलेली फुलपाखरे अखेर सापडली

ठाणे महापालिकेची चोरीला गेलेली फुलपाखरे अखेर सापडली

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 1:52AMठाणे : प्रतिनिधी

 सुट्टीच्या काळात चिमुकल्यांच्या मनोरंजनासाठी ठाणे पालिकेच्यावतीने झाडांवर लावण्यात आलेली दोन शोभिवंत कृत्रिम फुलपाखरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ठाण्यात समोर आली होती. या फुलपाखरू चोरी प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी फुलपाखरे चोरणार्‍या चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून चोरीस गेलेली फुलपाखरेही हस्तगत केली आहेत. निहाल जंगबहाद्दूर सिंग (वय - 24, राहणार - हनुमान नगर, वागळे स्टेट, ठाणे) आणि गोविंद नरमु चौहान (22, इंदिरा नगर, रूपादेवी पाडा, वागळे स्टेट, ठाणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली फुलपाखरे व त्यांनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही फुलपाखरे पुन्हा झाडांवर लावण्यात येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली.

11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 12 एप्रिल सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही फुलपाखरू चोरीची घटना घडली होती. या चोरीप्रकरणी पालिकेच्यावतीने कनिष्ठ अभियंता प्रमोद राऊळ यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला होता. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्यात येत होता. अखेर पोलिसांनी हे फुलपाखरू चोरणार्‍या दोघा चोरट्यांना शनिवारी रात्री अटक केली.  

Tags : mumbai, stolen butterflies, finally found, Thane Municipal Corporation,  mumbai news,