Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॅपिनेस इंडेक्स वाढवणारा ठाण्याचा अर्थसंकल्प

हॅपिनेस इंडेक्स वाढवणारा ठाण्याचा अर्थसंकल्प

Published On: Mar 20 2018 2:13AM | Last Updated: Mar 20 2018 2:05AMठाणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 10 टक्के करवाढ करणार्‍या ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोणत्याही प्रकारची करवाढ न करता  2017-18 चे 3047.19 कोटींचे सुधारित आणि 2018-19चे 3695.13 कोटींचे मूळ अंदाजपत्रक सोमवारी महासभेत सादर केले आहे. मेट्रोच्या जोडीला अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतूक, वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंट प्रकल्प असे अंतर्गत वाहतुकीचे जाळे सक्षम करण्याबरोबरच यंदा पहिल्यांदाच हॅपिनेस इंडेक्स वाढवण्यासाठी तब्बल 100 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत ठाणे महापालिकेच्या महसुली उत्पन्नामध्ये तब्बल 1200 कोटींची वाढ झाली असून सलग चौथ्यांदा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणारे संजीव जयस्वाल आतापर्यंतच्या आयुक्तांमध्ये पहिलेच पालिका आयुक्त आहेत. 

ठाणे महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात नसल्यामुळे यावर्षीही पालिका आयुक्तांना अर्थसंकल्प महासभेत सादर करावा लागला. गेल्यावर्षीच्या प्रकल्पामध्ये ज्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती, त्या प्रकल्पांचा अंतर्भाव काही प्रमाणात यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रकल्पांची घोषणा न करता यंदा पहिल्यांदाच हॅपिनेस इंडेक्स वाढवण्यासाठी महापालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावतानाच याला आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची जोड देऊन त्यांचे हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. समाजातील प्रत्येक माणसाचा आनंद हा सामाजिक प्रगतीचा मानदंड मनाला जातो. त्यामुळे प्रत्येकाला समाधानकारक जीवन जगता यावे यासाठी शासकीय योजना असल्या तरी पर्यावरण जीवनशैली, खासगी जीवनशैली तसेच मानसिक आणि आरोग्यविषयक संतुलन राहावे यासाठी हॅपिनेस इंडेक्स ही महत्त्वाची योजना राबवण्यात येणार आहे. या हॅपिनेस इंडेक्सच्या अंतर्गत अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा मानस पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यामध्ये ग्लोबल चॅलेंज फंड, सार्वजनिक व खासगी शाळा भागीदारी, रेडिओ स्कूल, सर्वांसाठी कौशल्यविकास, रे ऑफ लाईट, क्षयरोग नियंत्रण वाहन, समुपदेशन केंद्र, धूरविरहित केंद्र, अनुकूल ट्रॅफिक व्यवस्थापन यंत्रणा, क्षयरोग दत्तक योजना, कुटुंबसौख्य योजना, सुदृढ मातृत्व योजना, प्रसूतीपूर्व बाळाच्या तपासण्या, वैद्यकीय सहाय्य योजना, राजमाता जिजाऊ बेटी बचाओ व बेटी पढाओ योजना, हिरकणी योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

ग्लोबल चॅलेंज फंड 

शहरातील नवीन उद्योजकांसाठी ही योजना राबवण्यात आली असून नवीन उद्योजकांसाठी या योजनेअंतर्गत निधी उभा केला जाणार आहे. यामध्ये ज्या उद्योजकांकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असतील अशा उद्योजकांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

रेडिओ स्कूल 

शालेय विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शाळेअंतर्गत शाळेद्वारे चालविणार्‍या रेडिओ संकल्पनेद्वारे मुलांचा विकास करण्यासाठी रेडिओ विद्यालय ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

समुपदेशन केंद्र  

व्यक्तीमध्ये नैराश्याची भावना निर्माण होणे ही आजच्या पिढीतील समस्या झाली असून यंदाच्या अर्थसंकल्पात ही समस्या सोडवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. व्यक्तीचे नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे . 

धूरविरहित केंद्र 

महापालिका हद्दीत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग फ्री टॉवर उभारण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

रे ऑफ लाईट 

कर्करोग रुग्णांसाठी विविध प्रकारच्या सुविधांनी युक्त अशा वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. 

अनुकूल ट्रॅफिक व्यवस्थापन यंत्रणा  

वाहतूक व्यवस्थापनप्रणाली विकसित करून प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चौपाटी विकास, फोल्टिंग मार्केट, पार्किंग प्लाझा, उपवन जिमखाना, शाळा बांधकाम, दवाखाने बांधकाम, तीनहात नाका मिनी मॉल, स्मशानभूमी व कब्रस्तान, सर्वधर्मीय स्मशानभूमी,  सेंट्रल पार्क, ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या माध्यमातून एकाच छताखाली रोजगाराच्या संधी, दिवा-मुंब्रा पाणीपुरवठा योजनेचे रिमॉडेलिंग अशा योजनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असून,  भुयारी गटार योजनेच्या 4 टप्प्यांसाठी पालिका निधी खर्च करणार आहे. 

Tags : Thane Municipal Corporation, Budget, presented,