Tue, May 21, 2019 18:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे-मुंबई-वसई जलवाहतुकीचा करार तीन आठवड्यातच

ठाणे-मुंबई-वसई जलवाहतुकीचा करार तीन आठवड्यातच

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:36AMठाणे : खास प्रतिनिधी

ठाणे-मुंबई-वसई या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज केलेल्या योजनेच्या सादरीकरणानंतर तीन आठवड्यांत या प्रकल्पाबाबत ठाणे महापालिकेने केंद्राशी करार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतर्गत जलवाहतूक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंर्दभातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला सॉप्ट टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

 महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी वाहतूक भवनात केंद्रीय जलवाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून ना.गडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा जेणेकरून सदर प्रकल्पासाठी लागणार्‍या निधीचे वितरण करणे सुलभ होईल, असे सांगितले. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ना. गडकरी यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचीन शिपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पामुळे नागरिकांना कमी वेळात प्रदूषणविरहित जागतिक दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल हे उपस्थित होते.