Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेबांमुळेच मी व्यंगचित्रकार झालो : प्रभाकर झळके

बाळासाहेबांमुळेच मी व्यंगचित्रकार झालो : प्रभाकर झळके

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:44AMठाणे : अनुपमा गुंडे 

व्यंगचित्रांच्या दुनियेत मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणले. मी आज जो काही आहे, तो बाळासाहेबांमुळेच आहे. माझ्या जीवनगौरव पुरस्काराचे खरे श्रेय बाळासाहेबांनाच आहे. त्यांनाच मी हा पुरस्कार अर्पण करतो. 5 हजारहून आधिक व्यंगचित्रे रेखाटणारे आणि वयाच्या 80 व्या वर्षातही कार्यरत असलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.  ठाणे येथे 20 व 21 जानेवारीला अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संस्था कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने हास्यदर्शन 2018 या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात येवला येथील ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना त्यांच्या कलासेवेबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल तसेच सामाजिक सेवेबद्दल कार्टुनिस्ट कंबाईन पिंताबरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, त्यानिमित्ताने झळके यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी झळके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

लहानपणापासून मला विनोद वाचण्याची खूपच आवड होती. माझ्या मामांनी मला हरिश्‍चंद्र लचके यांचे हसा आणि लठ्ठ व्हा हे पुस्तक वाचायला दिले. या  पुस्तकामुळे माझा व्यंगचित्रांशी संपर्क आला, त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या मनावर झाला. 1961 मध्ये मी शिकण्यासाठी औरंगाबाद येथे आलो. त्यावेळी मार्मिक या मासिकाच्या वतीने ‘वस्त्रे अशी अबू्र घेतात’  या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मी सहज भाग घेतला, आणि मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर माझा  बाळासाहेबांशी स्नेह जुळला. मार्मिकबरोबर महाराष्ट्रातील अनेक दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांना व्यंगचित्रे पाठवू लागलो, या सगळ्याचे श्रेय बाळासाहेबांचे आहे. येवला येथे शाळेतील चित्रकला शिक्षकाची नोकरी सांभाळून मी ही कला सांभाळली आणि जोपासल्याचे ते म्हणाले.