Wed, May 22, 2019 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणेभूषण बनारसी चोटेले यांचे निधन

ठाणेभूषण बनारसी चोटेले यांचे निधन

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:15AMठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या 40 वर्षांपासून शवविच्छेदनाचे काम करणार्‍या व मागील वर्षी ठाणेभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या बनारसी चोटेले यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. ते गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

बनारसी चोटेले हे जिल्हा सामान्य रुग्णालयात वयाच्या 14 व्या वषार्ंपासून आजोबा (आईचे वडील) शिपय्या चव्हाण यांच्यासोबत येत होते. बनारसी यांचे आजोबा शिपय्या हे ब्रिटिश काळापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करत असत. त्यावेळी आजोबा करीत असलेले शवविच्छेदनाचे काम बघून बनारसींनीही तेच काम पुढे हाती घेतले. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करायला सुरुवात  केली. तेव्हापासून तब्बल 40 वर्षे रुग्णालयात ते शवविच्छेदनाचे काम करीत होते. ठाणे शहरातील किसन नगर, मुंब्रा शिळफाटा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर आदी विविध भागांत झालेल्या इमारत दुर्घटनांतील, अपघातांतील व अग्निकांडातील मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचे काम त्यांनी केले. 

बनारसी चोटेले हे दहा वषार्ंपासून हेवी डायबेटीससारख्या आजाराने ग्रस्त होते. 22 फेब्रुवारी रोजी तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल  करण्यात आले. मात्र, त्यांचे शरीर औषधांना दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यामुळे त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याचाही काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुनही गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.